Pune : आईच्या कुशीत झोपलेल्या 3 वर्षाच्या मुलीचं अपहरण, पोलिसांची ‘अ‍ॅक्शन’ सुरू होताच मुलीला सोडलं

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – घराच्या खिडकीतून हात घालून दार उघडत आईजवळ झोपलेल्या 3 वर्षाच्या मुलीला पळविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारती विद्यापीठ परिसरात मध्यरात्री ही घटना घडली आहे. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. सुदैवाने पोलीस व नातेवाईकांनी शोध सुरू केल्यानंतर आरोपींनी मुलीला सोडून पळून पसार झाले.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात 32 वर्षीय पित्याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे खासगी वाहणावर चालक आहेत. तर त्यांची पत्नी गृहिणी आहे. त्यांना 3 वर्षाची मुलगी आहे. ते राहण्यास आंबेगाव पठार परिसरात आहेत. दरम्यान बुधवारी फिर्यादी यांची पत्नी मुलीसोबत झोपले होती. यावेळी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास खिडकीतून हात घालून अज्ञात व्यक्तीने दरवाजा उघडला. यानंतर आईजवळ झोपलेल्या 3 वर्षाच्या मुलीला उचलून पळ काढला. काही वेळातच फिर्यादी यांना जवळ मुलगी नसल्याचे लक्षात आले. त्यांनी पती व नातेवाईकांना व पोलिसांना माहिती दिली. तात्काळ भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस व नातेवाईकांनी परिसरात मुलीचा शोध सुरू केल्यानंतर काही अंतरावर मुलीला सोडून पसार झाले होते. त्यांनी मुलीला घेऊन आई-वडिलांकडे दिले. मुलीला सुखरूप पाहिल्यानंतर कुटुंबाच्या जिवात जीव आला. मात्र मुलीला घरात घुसून आईजवळून पळवून नेल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप तरी त्यांचा पत्ता लागलेला नाही. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.