‘हनीट्रॅप’द्वारे अपहरण करून खंडणीची मागणी, तरूणी ‘गोत्यात’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन –    चार लाखांच्या खंडणीसाठी एका युवकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याच प्रियसीने साथीदारांच्या मदतीने त्याचे अपहरण केल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. त्याच्या प्रियसीसह सात जणांच्या टोळीला अटक करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त विनय राठोड यांनी सोमवारी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच हा तरुण उत्तर प्रदेशमधून वागळे इस्टेट येथे भावाकडे वास्तव्यास आला होता. या तरुणाचे गावी असताना नर्गिस मो. जावेद ऊर्फ नन्हे शेख (२०) या तरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते. हा तरुण ठाणे येथे आला असता ती तरुणीही आपल्या वडिलांसोबत वसई येथे आपल्या नातेवाईक सबिना हिच्या घरी आले. तिथे त्यांनी अपहरणाचा कट रचला. त्यानुसार ३१ ऑक्टोबरला नर्गिसने त्याला वसई येथील बजरंग ढाबा परिसरात बोलावले. तो त्याठिकाणी पोहोचल्यानंतर एक मोटारकार आली त्यामध्ये नर्गिस तिचे वडील मोहम्मद परवेझ शेख आणि त्यांचे पाच साथीदार होते. त्याचे अपहरण करून त्याला वसई येथे शेख याच्या घरी डांबले होते. त्याला मारहाणही केली होती. अपहरणकर्त्यानी त्याच्या भावाला फोन करून चार लाखांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी भावाने वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तकरार दाखल केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.