मुलाचा वाढदिवस साजरा व्हावा म्हणून वडिल पोहोचले न्यायालयात अन्…

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   प्रथमच एका प्रकरणात न्यायालयालाही हळवं व्हावं लागलं. तसं पहिले तर न्यायनिवाडा करताना कायद्याचा दंड कठोरपणे वापरला जातो. आर्णी येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात आला. विभक्त राहात असलेल्या आई-वडिलामुळे मुलगा वडिलांपासून दुरावला होता. मुलाचा वाढदिवस साजरा व्हावा, ही इच्छा घेऊन वडील न्यायालयात पोहोचले. न्यायाधीश एस.एच. शाहीद व एस.के. अलअमोदी यांच्याकडे याचना केली. न्यायालयाने परवानगी देत थेट न्यायालयातच मंगळवारी ६ एप्रिल रोजी या चिमुकल्याचा चौथा वाढदिवस साजरा केला.

दरम्यान, न्यायालयीन प्रक्रियेत मुलाचा ताबा प्राधान्याने आईकडे दिला जातो. पती-पत्नीच्या वादात सर्वाधिक नुकसान होते ते मुलांचं. बापाचं मनही मुलाची ओढ घेऊन झुरत असतं. अशाच एका वडिलाने तीन वर्षांपासून मुलापासून दूर असल्याने न्यायालयात धाव घेतली. चिमुकल्याची माया वडिलांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी न्यायालयाकडे मुलाचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी मागितली. न्यायालयानेही या भावेनचा आदर करत मानवतेच्या दृष्टीकोनातून त्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी दिली.

एवढेच नाही तर खुद्द न्यायाधीशांनीच यासाठी पुढाकार घेतला. न्या. एस.के. अलअमोदी, न्या. एस.एच. शाहीद यांच्यासह विधिज्ञ ॲड. पी.जी. ठाकरे, ॲड. चौधरी, ॲड. गणेश धात्रक यांची चिमुकल्या पार्थचा वाढदिवस न्यायालयात केक कापून साजरा करीत एक नवा आदर्श घालून दिला. मानवी संवेदनेला न्यायालय किती प्राधान्य देते हेही यानिमित्ताने पुन्हा एकदा पाहयला मिळाले. गुन्हेगाराला शिक्षा देताना कठोर होणारं न्यायालयसुद्धा मातृहृदयी असते, याचा प्रत्यय आर्णीत आला. हा वाढदिवस काही क्षणासाठी सर्वांनाच भावनाविवश करून गेला. तेथे उपस्थित प्रत्येकातीलच वडील जागा झाला. चिमुकल्यालाही तीन वर्षांपासून वडिलांच्या सहवासाला मुकावे लागले होते. त्याच्यासाठी तो क्षणही सर्वोच्च आनंदाचा होता. त्याने मोठ्या आनंदात आई-वडिलांच्यासोबत न्यायालयात केक कापून वाढदिवस साजरा केला. न्यायालयाच्या एकंदर कामकाजात विभक्त आई-वडिलांच्या वादात भरडल्या जाणाऱ्या चिमुकल्याचा वाढदिवस साजरा करण्याचा हा जिल्ह्यातील कदाचित राज्यातील पहिलाच प्रसंग असावा, असे सांगितले जात आहे.