कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे लहान मुले भाजली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

रस्त्याचे खोदकाम करत असताना त्या ठिकाणी असलेली भूमीगत एमएसईबीची केबल उघडी राहीली. कंत्राटदाराने ही केबल योग्यरित्या न बूजवल्याने आणि त्याठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाय योजना केली नसल्याने, स्पर्कींग होऊन दोन लहान मुले भाजली. ही घटना शनिवारी (दि.२१) रात्री साडेनऊच्या सुमारास आंबेगाव-पठार येथील हर्णाई बिल्डींग जवळ घडली. याप्रकरणी कंत्राटदाराविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मे. सनराज कन्सट्रक्शन कंपनीचे मालक संदिप हनमघर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. याप्रकरणी जालींदर सुळे (वय-38, रा. होळकरनगर, आंबेगाव-पठार) यांनी फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनमघर यांच्या कंपनीचे आंबेगाव पठार येथील रस्त्याचे काम सुरु आहे. रस्त्याची खोदाई करत असताना भूमीगत असलेली एमएसईबीची केबल उघडी राहीली. उघडी राहीलेली केबल संदीप हनमघर यांनी योग्य पद्धतीने बुजवली नसल्याने आणि या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाय योजना न केल्याने वायरींगमध्ये स्पार्कींग होऊन सुळे यांची मुलगी तेजस्वीनी गंभीर रित्या भाजली. तसेच त्यांच्या बिल्डींग समोर राहणारा नऊ वर्षांचा श्रीहान हा मुलगा देखील भाजला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.एस. काळे करीत आहेत.