Amravati News : चकमकीत नक्षल्यांचा खात्मा, पोलीस अधीक्षक हरीबालाजी यांना शौर्यपदक

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांना त्यांच्या गडचिरोली जिल्ह्यातील कामगिरीकरीता पोलीस शौर्यपदक जाहीर झाले आहे. गडचिरोली येथे अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) या पदावर कार्यरत असताना हरी बालाजी यांनी नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी स्थापन झालेली C-60 विशेष कमांडो पोलीस दलाची कमान सांभाळली.

निहायकल जंगल परिसरामध्ये 19 नोव्हेंबर 2018 मध्ये नक्षल्यांसोबत झालेल्या चकमकीत खून, जाळपोळ यासारखे गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या दोन नक्षलवाद्यांचा त्यांनी खात्मा केला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पोलीस शौर्यपदक प्रदान करण्यात येणार आहे.

74 नक्षलवाद्यांचा खात्मा
गडचिरोलीमध्ये कार्यरत असताना त्यांनी आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात 34 चकमकींदरम्यान तब्बल 74 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात त्यांची निर्णायक भूमिका ठरली. तसेच नलक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाची आत्मसमर्पण योजनाही त्यांनी प्रभावीपणे राबवली.

मोठा शस्त्रसाठा जप्त
पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांच्या नेतृत्वातील पथाने 8 एमएम, 4 जिवंत काडतूस, 12 बोअर रायफल, 11 जिवंत काडतूस, 12 नग 303 चे जिवंत काडतूस, तीन किलोचा क्लेमोर बॉम्ब, चार किलोचे कुकर बॉम्ब, पिट्टू, नक्षल साहित्य जप्त केले होते.