यवतमाळ : पुर्ववैमनस्यातून युवकाचा खून, तासाभरात झाला पर्दाफाश

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन टीम – जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणाचा डोक्यात लोखंडी पाईप घालून खून केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथे घडली. ही घटना सोमवारी (दि.17) रात्री साडेनऊच्या सुमारास बाभूळगाव येथील नेहरुनगर मध्ये घडली. आरोपीने मयत तरुण हा झोपलेला असताना त्याच्यावर हल्ला केला. प्रवीण उर्फ पुरुषोत्तम भाऊराव गायकवाड (वय-30) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी या घटनेतील आरोपी अक्षय गोटफोडेला तासाभरातच अटक केली आहे. मयत आणि आरोपी यांच्यामध्ये पूर्वी वाद झाले होते. प्रवीण हा आरोपी अक्षयला दारुच्या नशेत नेहमी शिवीगाळ करत होता. याचा राग अक्षयच्या मनात होता. याचा वचपा काढण्यासाठी तो संधी शोधत होता. सोमवारी संध्याकाळी प्रवीण त्याच्या घरासमोर पालथा झोपला होता. हीच संधी सधून अक्षयने प्रवीणच्या डोक्यात लोखंडी पाईपने हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.

खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला होता. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला बाभूळगाव तालुक्यातील सांगवी मांग येथे ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, अंमलदार हरीभाऊ ठाकरे, अशोक गायकी, सचिन हुमने, प्रशांत पवार यांनी केली.