‘कोरोना’चे नियम मोडणार्‍यावर झाडल्या गोळ्या; हुकूमशहा किम जोंग उनने दिला होता आदेश

उत्तर कोरिया : वृत्तसंस्था –   उत्तर कोरियामध्ये कोरोनाच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेले नियम मोडले म्हणून एका व्यक्तीला सर्वांसमोर गोळी घातली आहे. कोरोनाचे नियम मोडणार्‍यांना पाहता क्षणीच गोळी मारण्याचे आदेश हुकूमशहा किम जोंग उनने दिले आहेत.

उत्तर कोरियामध्ये हुकूमशहा किम जोंग उनच्या या निर्णयामुळे लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच लोकांना घाबरविण्यासाठी उत्तर कोरियाने चीन सीमेवर अँटी एअरक्राफ्ट बंदुकाही तयार ठेवल्याची माहिती मिळत आहे.

उत्तर कोरिया देशाचा हुकूमशहा किम जोंग उन हा त्याच्या क्रूरतेसाठी लोकप्रिय आहे. त्याचा क्रूर चेहरा हा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याचदरम्यान उत्तर कोरियामध्ये कोरोनाच्या प्रतिबंधासाठी केलेल्या नियमांचं उल्लंघन करणे एका व्यक्तीच्या जिवावर बेतलं आहे. कोरोनाचे नियम मोडणार्‍यावर गोळ्या झाडल्या आहेत.
याबाबत ‘डेली मेल’ने दिलेल्या रिपोर्टनुसार, 28 नोव्हेंबर रोजी उत्तर कोरियाच्या सेनेने हुकूमशाह किम जोंग उन यांच्या आदेशानंतर एका व्यक्तीवर सार्वजनिकरित्या गोळ्या मारण्याचा आदेश दिला. कोरोना काळातील नियम मोडून चीनमधून साहित्याची तस्करी करताना ही व्यक्ती आढळल्याचा आरोप हा गोळ्या झाडण्यात आलेल्या व्यक्तीवर केला आहे. त्यानंतर त्यालाही शिक्षा दिली आहे.

…‘त्या’ अधिकार्‍यांवर झाडल्या होत्या गोळ्या

देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले म्हणून किम जोंगने याअगोदरही आपल्या 5 अधिकार्‍यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली आहे. हुकूमशहा किमच्या आदेशावरून या अधिकार्‍यांना गोळ्या घातल्या आहेत. अधिकार्‍यांनी किमच्या धोरणावरही टीका केली होती. या चर्चेवेळी त्यांनी देशात औद्योगिक सुधारणेची गरज असल्याचे म्हटले होते. तसेच उत्तर कोरियाने आपल्यावरील बंधने दूर करण्यासाठी परराष्ट्रीय मदत घ्यायला हवी, असे मतही या अधिकार्‍यांनी व्यक्त केलं होतं. यानंतर 30 जुलैला त्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या.