हुकूमशाहा किम जोंग उनकडून निकृष्ट वैद्यकीय उपकरणे घेणाऱ्या अधिकाऱ्याला मृत्यूदंड

प्योंगयांग : वृत्तसंस्था – आपल्या क्रूर कृत्यासाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांनी एका मोठ्या अधिकाऱ्याला मृत्यूदंड दिला. चीनकडून निकृष्ट दर्जाचे वैद्यकीय सामग्रीची खरेदी केल्याचा आरोप या अधिकाऱ्यावर होता. या अधिकाऱ्याने राजधानी प्योंगयांगमध्ये निर्माणाधीन असलेल्या रुग्णालयासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य खरेदी केले होते. हे रुग्णालय उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगण्यात येत आहे.

दक्षिण कोरियाच्या एका वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त दिले आहे. वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, किम जोंग यांनी गेल्या वर्षी प्योंगयांग येथील रुग्णालय नुतनीकरणासाठी पाडले होते. या ठिकाणी सहा महिन्यात एक मोठे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार होते. किमच्या निर्देशानंतरही उद्घाटनाच्या दिवसापर्यंत हे रुग्णालय तयार झाले नाही. या रुग्णालयात वैद्यकीय उपकरणाचा तुटवडा होता. त्यामुळेच उत्तर कोरियाच्या आयात-निर्यातीची देखरेख करणाऱ्या एका अधिकाऱ्याने चीनमधून तातडीने वैद्यकीय उपकरणे खरेदी केली.

वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, किम जोंग यांनी रुग्णालयाबाबत एक आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांना अधिकाऱ्याने चिनमधून वैद्यकीय उपकरणे आणल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने या अधिकाऱ्याला दोषी ठरवले आणि मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात एका अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे इतर प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

उत्तर कोरियावर असलेल्या निर्बंधामुळे आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे युरोपीयन देशांकडून उत्तर कोरियाला वैद्यकीय उपकरणे, सामग्री मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याने चिनमधून या वस्तूंची आयात करण्याचा निर्णय घेतला. मात्र, चिनमधून आयात करण्यात आलेली वैद्यकीय उपकरणे निकृष्ट दर्जाची असल्याचे समोर आले. किम जोंग यांनी या हॉस्पिटलसाठी लागणारी प्रत्येक वस्तू युरोपमधून मागवणार होते. किम जोंग यांचा युरोपमधील वस्तूंवर विश्वास असून त्या उत्तम दर्जाच्या असतात असा विश्वास आहे.