किरण गित्ते यांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ वाढविण्यास केंद्राचा नकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगर विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांचा राज्यातील  प्रशासकीय प्रतिनियुक्तीचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांची बदली झाली आहे. गित्ते हे मूळचे त्रिपुरा केडर चे असून प्रतिनियुक्तीचा कालावधी वाढून मिळावा यासाठी केलेल्या विनंतीस केंद्र शासनाने नकार दिल्याने ते लवकरच त्रिपुरा शासन सेवेत रुजू होणार आहेत.

किरण गित्ते यांचा राज्य शासनातील प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ ५ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आला. यानंतर त्यांनी शासनाच्या आदेशानुसार पीएमआरडीएचा तात्पुरता कार्यभार पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे सोपविला आहे. दरम्यानच्या काळात प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ वाढवून मिळावा यासाठी त्रिपुरा राज्यशासनाच्या माध्यमातून केंद्राला विनंती केली होती. केंद्राने हा कार्यकाळ वाढवून देण्यास नकार दिल्याने गित्ते यांना त्रिपुरा शासन सेवेत रुजू व्हावे लागणार आहे.

दरम्यान महेश झगडे यांच्याकडून २ वर्षांपूर्वी पीएमआरडीए च्या आयुक्त पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर गित्ते यांनी प्रकल्पांना गती दिली. रिंगरोड, शिवाजीनगर ते हिंजेवाडी मेट्रो, माण – म्हाळुंगे टीपी स्कीम यांना मंजुरी मिळवण्यापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात झाली. तसेच अन्य चार टीपी स्कीम, पीएमआरडीए क्षेत्रात अग्निशामक केंद्रांची उभारणी, वाघोली येथे सर्विस रस्त्याचे काम अशा महत्वपूर्ण कामाचा यामध्ये समावेश आहे.