‘या’ नेत्यानं जाहीर केली मोठमोठ्या कर्जबुडव्यांची यादी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – येस बँकेचे जवळपास 60 हजार कोटी देशातील बड्या 15 उद्योग समुहांनी बुडवले आहेत. त्यातील 10 कर्जबुडव्या कंपन्यांची नावे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करून जाहीर केली आहेत. या कंपन्यांच्या थकबाकीने येस बँक बुडाली असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.

मागील आठवड्यात आरबीआयने येस बँकेवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे येस बँकेच्या ग्राहकांना 3 एप्रिलपर्यंत केवळ 50 हजार रुपये तेही एकदाच काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, या बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक व सीईओ राणा कपूर यांना ईडने अटक केली असून त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे. राणा यांनी त्यांची कॉर्पोरेट मैत्री जपली आणि मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केल्याने बँकेची ही स्थिती झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, राणा यांनी हे आरोप फेटाळून लावत हात झटकले आहेत.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बँकेच्या बड्या थकबाकीदार कंपन्यांची नावे आणि त्यांच्याकडे असलेली थकबाकी रक्कमेची माहिती बुधवारी जाहीर केली आहे. यामध्ये अनिल अंबानी – 12 हजार 800 कोटी, एस्सेल ग्रुप – 8 हजार 400 कोटी, DHFL ग्रुप – 4 हजार 735 कोटी, IL & FS – 2 हजार 500 कोटी, ओमकार रिअॅल्टर्स – 2 हजार 710 कोटीचे कर्ज थकवले आहे. तसेच जेट एअरवेज 1 हजार 100 कोटी, कॉक्स अँड किंग्ज आणि गो ट्रॅव्हल्स 1 हजार कोटी, बी.एम खेतान 1 हजार 250 कोटी, रॅडियस डेव्हलपर्स 1 हजार 200 कोटी, सी.जी पॉवर 500 कोटी रुपयांचे कर्ज बुडवले असल्याचे सोमय्या यांनी म्हटलं आहे. यांनी येस बँक बुडवली असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.