वीस वर्षाच्या मुलीला घेऊन ‘राज’कारण करू नये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यात विविध ठिकाणच्या सभांमध्ये मोदी सरकारने केलेल्या विविध योजना कशा प्रकारे फसल्या याचे व्हिडीओ दाखवत आहेत. काल झालेल्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी मुंबई लोकल अपघातात हात गमावल्यानंतर भाजपची ‘पोस्टर गर्ल’ मोनिका मोरेला व्यासपिठावर बोलवले होते. तिने नोकरीचे आश्वासन हवेतच विरल्याची खंत यावेळी बोलून दाखवले होते. यावर टीका करताना किरीट सोमय्या म्हणाले, आम्ही प्लॅटफॉर्मची उंची वाढवली आहे, आता राज ठाकरे यांची राजकीय उंची कमी झाली त्याला आम्ही काय करणार. राज ठाकरेंनी माझ्याशी लढाव, एका वीस वर्षाच्या मुलीला घेऊन स्वत:ची उंची वाढवण्याचा प्रयत्न करू नये, तसेच मोनिका मोरेला राजकारणाशी न जो़डण्याचा सल्ला राज ठाकरेंना दिला.

किरीट सोमय्या यांनी राज ठाकरेंना टोला लगावताना म्हणाले, मोनिकाला मदत करणे हे माझे कर्तव्य होते. मी अकराशे जणांना मदत केली आहे. याला राजकारणाशी जोडू नका. एका वीस वर्षाच्या मुलीला घेऊन राजकारण करायचे असेल, तर देव त्यांना सुबुद्धी देवो. मोनिकाला नोकरीची गरज असेल तर सर्वांनी मदत करायला हवी, राजाभाऊंनी सुद्धा केली तर बरे होईल, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

महिन्यापूर्वी मोनिका नोकरीसाठी माझ्याकडे आली होती. तिला तीन कॉल आले, एक ऑफर लेटरही आले होते, असा दावा सोमय्यांनी केला. शासकीय नोकरी आणि घराची तरतूद नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी मोनिकाला नोकरी नाकारल्याचे त्यांनी सांगितले. त्या काळात मोनिकाला खूप जणांनी मदत केली होती. मोनिकाच्या नावाने मोठी रक्कम बँकेत जमा असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.