कोविड काळात कीर्तन हे समुपदेशनाचे साधन – डॉ. एन. एस. उमराणी यांचे मत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कीर्तन हे भक्तीभाव व प्रबोधन करण्याचे पवित्र आणि समृद्ध माध्यम आहे. मानसशास्त्राला जे जमले नाही, ते कीर्तन परंपरेने करुन दाखविले. कोविड काळात कीर्तन हे समुपदेशनाचे महत्वाचे साधन म्हणून उपयुक्त ठरले, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.एन.एस.उमराणी यांनी व्यक्त केले.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे आणि सेवा मित्र मंडळातर्फे पुणे कीर्तन महोत्सवचे आयोजन करण्यात आले. महोत्सवाच्या समारोपप्रसंगी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.मोरेश्वरबुवा जोशी चर्‍होलीकर यांना कीर्तन कोविड ह.भ.प. स्व. कमलाकर बुवा औरंगाबादकर स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ह.भ.प.मंगलमूर्ती औरंगाबादकर, शाहीर हेमंतराजे मावळे, शिरीष मोहिते, प्रा.संगिता मावळे आदी उपस्थित होते.

डॉ.एन.एस.उमराणी म्हणाले, आपल्याला जे माहित आहे, ते चांगले ज्ञान समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम कीर्तनकार कीर्तनाच्या माध्यमातून करीत आहेत. कीर्तनाची परंपरा तरुणाईपर्यंत पोहोचायला हवी. समाजाला ताकद देण्याची क्षमता कीर्तनासारख्या कलांमध्ये आहे. प्रबोधन, शिक्षण आणि समुपदेशनाकरीता कीर्तन परंपरा गरजेची आहे.

ह.भ.प.मोरेश्वरबुवा जोशी चर्‍होलीकर म्हणाले, कीर्तन क्षेत्रात कितीही काम केले, तरी कमी आहे. समाजाला कीर्तनातून प्रबोधनाची गरज आहे. समाजाने ख-या अर्थाने वंदन केलेली कीर्तनाची गादी आहे, ती आपण जपायला आणि वाढवायला हवी. होनराज मावळे यांनी सूत्रसंचालन केले.