किर्तनकार इंदोरीकर महाराजांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन  –  कीर्तनकार निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांना अहमदनगरमधील संगमनेर कोर्टाने 7 ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्या विरोधात 19 जून 2020 रोजी संगमनेर कोर्टात गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाची पहिली सुनावणी आज (शुक्रवार) पार पडली. त्यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले.

समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराजांना 7 ऑगस्ट न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून वैयक्तिकरित्या हजर राहून त्यांना जामिनासाठी अर्ज करावा लागणार आहे. यापूर्वी इंदोरीकर महराज यांच्यावर संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीची नोटीस अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सचिव अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सक अधिकाऱ्यांना 17 फेब्रुवारी रोजी बजावली होती.

स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते असे विधान इंदोरीकर महाराज यांनी केले होते. या विधानामुळे त्यांच्या विरोधात गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी फिर्याद दिली होती. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सचिव अॅड. रंजना गवांदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पुराव्यानिशी इंदोरीकरांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीवरून फिर्याद दाखल करण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सांनी आदेश दिले होते. यावर आज सुनावणी झाली.