किसान रेल्वेद्वारे शेतकरी व व्यापारी बांधवांनी परराज्यात शेतीमाल पाठवावा, लासलगांवी 17 पासुन मिळणार थांबा

लासलगांव : देवळाली ते मुझफ्फरपूर या देशातील पहिल्या किसान रेल्वे पार्सल गाडीला गुरूवार दि. 17 पासुन लासलगांव येथे थांबा मिळणार असल्याने शेतकरी व व्यापारी बांधवांनी आपला शेतीमाल कमी वेळेत परराज्यात पाठविणेसाठी किसान रेल्वेला प्राधान्य द्यावे असे आवाहन लासलगांव बाजार समितीच्या सभापती सौ. सुवर्णा जगताप यांनी केले आहे.

बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधव व व्यापारी वर्गास त्यांचा शेतीमाल कमी वेळेत परराज्यात पाठविणेसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या किसान रेल्वे गाडीला लासलगांव येथे थांबा मिळणेसाठी बाजार समितीच्या कार्यालयात कार्यक्षेत्रातील शेतकरी, व्यापारी व रेल्वेचे अधिकरी यांचे समवेत सौ. जगताप यांनी वेळोवेळी बैठका घेऊन त्यांच्या मागणीनुसार दिंडोरीच्या खासदार डॉ. सौ. भारतीताई पवार यांचेमार्फत केंद्रीय रेल्वेमंत्री मा. ना. पियुषजी गोयल यांचेकडे देवळाली ते मुझफ्फरपूर या देशातील पहिल्या किसान रेल्वे पार्सल गाडीला लासलगांव येथे थांबा मिळावा यासाठी विनंती केली होती.

सदर विनंतीनुसार रेल्वे मंत्रालयाने लासलगांव बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधव व व्यापारी वर्गाच्या हितासाठी देवळाली ते मुझफ्फरपूर या देशातील पहिल्या किसान रेल्वे पार्सल गाडीला गुरूवार दि. 17 पासुन लासलगांव येथे थांबा दिला आहे. त्याबद्दल लासलगांव बाजार समितीच्या वतीने सौ. जगताप यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री मा. ना. पियुषजी गोयल व दिंडोरीच्या खासदार डॉ. सौ. भारतीताई पवार यांचे आभार मानले असुन खासदार डॉ. सौ. भारतीताई पवार ह्या दिल्ली येथे अधिवेशनासाठी गेल्या असुन त्या दिल्लीहुन सदर किसान रेल्वे गाडीला ऑनलाईन फ्लॅग दाखविणार असल्याची माहिती सौ. जगताप यांनी दिली.

तसेच गुरूवार दि. 17 रोजी लासलगांव येथे सायंकाळी 07.22 वा. थांबणा-या किसान रेल्वे पार्सल गाडीद्वारे परराज्यात आपला शेतीमाल पाठविणेसाठी शेतकरी व व्यापारी वर्गाने लासलगांव रेल्वे स्टेशनचे मुख्य पार्सल तथा बुकींग पर्यवेक्षक व्ही. बी. जोशी यांचेशी 9921292199 / 9503011982 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधुन मोठ्या संख्येने आपला शेतीमाल सदर गाडीने परराज्यात पाठवावा असे आवाहन सभापती सौ. जगताप यांनी कार्यक्षेत्रातील शेतकरी व व्यापारी बांधवांना यावेळी केले आहे.

लासलगांव स्टेशनवरून कोठे पाठविता येईल शेतीमाल (कंसात भाडे दर प्रति क्विंटलचे) :-

जबलपुर (रू. 220.94), कटनी (रू. 247.65), सतना (रू. 267.35), माणिकपुर (रू. 291.26), मुगलसराय (रू. 345.84), बक्सर (रू. 368.56), दानापुर (रू. 390.28), मुझफ्फरपुर (रू. 408.39)