‘किसान रेल्वे’ ठरतेय लाभदायक ! ऑगस्टमध्ये 608 टन शेतमालाची वाहतूक

पोलिसनामा ऑनलाईन – देशातील पहिली ‘किसान एक्स्प्रेस’ देवळाली ते दानापूर 7 ऑगस्टपासून सुरू करण्यात आली. त्याला शेतकरी आणि व्यापार्‍यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे अवघ्या तीन आठवडयांतच तब्बल 608 टन शेतमालाची वाहतूक करण्यात आली. शेतकर्‍यांच्या मागणीनुसार गाडीचा मुजफ्फरपूरपर्यंत विस्तारही करण्यात आला.

शेती उत्पादन खराब होऊ नये आणि शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे यासाठी किसान रेल्वे महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे आठवडयातून एक दिवस धावणार्‍याा या गाडीला मिळणारा प्रतिसाद पाहून ती आठवडयातून दोन दिवस (मंगळवार आणि शुक्रवार) सोडण्यात आली. यामुळे जलद आणि स्वस्त वाहतुकीबरोबरच, योग्य किमतीमुळे महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे जीवन बदलत आहे. किसान रेल्वेद्वारे कृषी उत्पादने जलद गतीने देशातील एका कोपर्‍यातून दुसर्‍या कोपर्‍यापर्यंत पोहचविली जात आहेत. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहकांना फायदा होत आहे. किसान रेल्वेला भुसावळ विभागात चांगला प्रतिसाद मिळत असून पहिल्या फेरीत 90.92 टन मालाची वाहतूक केली. दुसर्‍या फेरीत 99.58 टन, तिसर्‍या फेरीत 151.59 टन, चौथ्या फेरीत 108.06 आणि पाचव्या फेरीत 157.98 टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात भुसावळ विभागातून किसान रेल्वेद्वारे 608.13 टन माल विविध ठिकाणी पाठविण्यात आला.