‘मोदी सरकारनं 100 वेळा बोलावलं तरी जाऊ, पण कायदे रद्द झालेच पाहिजेत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर सरकारने आम्हाला 100 वेळा चर्चेसाठी बोलावल तरी आम्ही जाऊ, पण कृषी कायदे रद्द झालेच पाहिजेत, अशी ठाम भूमिका किसान संयुक्त मोर्चाचे (Kisan Sanyukta Morcha) नेते मनजीत सिंह राय यांनी मांडली आहे. आज शुक्रवारी (दि. 5) दुपारी चर्चेची 9 फेरी पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. आज पुन्हा शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी सरकारपुढे ठेवणार आहेत. सुप्रीम कोर्टाद्वारे स्थापित केलेल्या समितीमधून भूपेंद्र सिंह यांनी माघार घेणे शेतकऱ्यांचा विजय असल्याचे ते म्हणाले.

राय यांनी समितीच्या बाकी तीनही सदस्यांना शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर ठेवत राजीनामा देण्याची विनंती केली आहे. तिन्ही कृषी कायदे केंद्र सरकारने आणले आहेत, त्यामुळे त्यांनीच कायदे मागे घ्यावेत, असेही ते म्हणाले. कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या 51 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असून हे कायदेच रद्द करा, अशी मागणी शेतकऱ्यांची असून त्यावर ते ठाम आहेत. दुसरीकडे केंद्र सरकारने कायद्यात सुधारणा करण्याची तयारी दाखवली आहे, पण कायदे रद्द करणार नसल्याचे म्हटल्याने तिढा कायम आहे.

आज होणा-या बैठकीबाबत एका आंदोलकाने म्हटले आहे की, सरकारसोबत आमच्या आधीही 8 बैठका झाल्या आहेत, ज्यातून राहीही तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांना आताही अशी काही आशा नाही की आजच्या बैठकीतून काही निष्पन्न होईल. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.