अभिनेते किशोर नांदलस्कर यांची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण; वाचून जाल भारावून !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे काल (मंगळवार) कोरोना व्हायरसची लागण झाल्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे. किशोर नांदलस्कर यांनी अनेक भूमिका निभावत प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र, अखेरीस त्यांची एक इच्छा अपूर्णच राहिली.

किशोर नांदलस्कर यांची इच्छा अपूर्ण राहिल्याचे दिग्दर्शक विजू माने यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. त्यामध्ये विजू माने यांनी लिहिले, की मी सिनेमात एक गाणं केलं होतं. वृद्धाश्रमात एका जोडप्याचा लग्नाचा वाढदिवस सुरू आहे. तेव्हा रमेश देव यांनी मला निक्षून सांगितलं होतं की, मला या गाण्यावर नृत्य करायचे आहे. त्यानंतर ते गाणे जेव्हा चित्रित होत होते तेव्हा रमेश देव, सीमा देव, उदय सबनीस, विजू खोटे, स्वतः नांदलस्कर ही सगळी मंडळी नृत्य करत होती. त्यानंतर एका ब्रेकमध्ये किशोर नांदलस्कर यांनी मला बाजूला नेले. अन् मला म्हणाले, ‘रमेश देव यांचे किती वय असेल रे?’ मी म्हटले ‘असेल 80 वगैरे…’ मग त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाले, ‘मी 80 वर्षांचा होईन तेव्हा माझ्यासाठी असेच एखादे गाणे करशील असे मला वचन दे’

दरम्यान, विजू माने यांनी नांदलस्कर यांना तसे वचनही दिले. मात्र, त्यापूर्वीच किशोर नांदलस्कर यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या या जाण्याने दु:ख झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांची ही इच्छाही पूर्ण होऊ न शकल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सतत अचूक टायमिंगने सेटवरचे वातावरण हलके-फुलके करणारी अशी निरागस व्यक्ती सोडून जाते तेव्हा अस्वस्थ व्हायला होते…सगळ्यांनी काळजी घ्या…, असेही माने यांनी लिहिले आहे.