‘माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता 2-2 मंत्री घेऊन धावाधाव करतात, हे किती मोठं दुर्दैव’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –    राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातील रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना राज्यातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. एकीकडे राज्य सरकार कोरोना स्थितीशी दोन हात करत असताना विरोधी भाजपसह इतर पक्ष सातत्याने टीका करताना दिसत आहेत. याला सरकारकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. अशातच आता माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन धावाधाव करतात, हे मोठं दुर्दैवी असल्याची टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

किशोरी पडणेकर म्हणाल्या, राज्यातील परिस्थिती पाहता सर्वांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना केला पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. विरोधक खूपच आक्रमक झालेले आहे. योद्धा म्हणून काम करायला तयार नाहीत. परिस्थिती अधिकाधिक कशी बिकट होईल, यासाठी लक्ष दिले जात आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. पत्रकार परिषदेत पेडणेकर यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

हे दुर्दैवी आहे

राज्यात परिस्थिती खूपच कठिण असताना महाराष्ट्रातील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जबाबदारीने काम केल्यास आपण यातून निश्चित बाहेर पडू. रेमडेसिवीर साठा पकडल्यानंतर माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता पोलीस ठाण्यात जातात. त्यांचा उद्देश काहीही असेल. मात्र, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना रात्रीच्या दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन जावे लागत आहे, हे किती मोठं दुर्दैव आहे. मुंबईत साठा सापडला, लोक वणवण फिरत आहेत, हे काय चाललं आहे, असा प्रश्न पेडणेकर यांनी विचारला आहे.

राज्यात बिकट परिस्थिती

महाराष्ट्र बिकट परिस्थितीतून चालला आहे. मुख्यमंत्री आणि त्यांची टीम वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणि सुलभ होण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी चालक कमी पडत असल्याने परिवहन मंत्री त्यावर काम करत आहेत. महापालिका आयुक्तांनी ऑक्सिजन उत्पादकांनाही आदेश दिले आहेत, असे पेडणेकर यांनी सांगितले.