शतक केल्यानंतर केएल राहुलने का बंद केले दोन्ही कान? स्वतः केला खुलासा

पोलीसनामा ऑनलाईन : इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात संघर्ष करीत असणाऱ्या भारतीय संघाचा डाव सांभाळण्याचे काम भारतीय संघाचा धाकड फलंदाज केएल राहुलने चोखपणे केले. राहुल मैदानावर आला तेव्हा भारतीय संघाचे 37 धावांवर दोन गडी बाद झाले होते. सर्वप्रथम, त्याने कर्णधार विराट कोहलीशी चांगली भागीदारी करून संघासाठी चांगला पाया रचला आणि 45 व्या षटकात तो विकेट गमावून बसला. तो बाहेर होता तोपर्यंत त्याने संघासाठी 2 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 108 धावा केल्या होत्या. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात राहुलनेही नाबाद 62 धावा केल्या.

या सामन्यात केएल राहुल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी साठी आला आणि त्याने आपले काम उत्तम प्रकारे केले. या सामन्यात शतक ठोकल्यानंतर त्याने अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केला. शतक झळकावल्यानंतर त्याने प्रथम आपले कान बोटाने बंद केले आणि नंतर आपले डोळे बंद केले. त्याने असे का केले याकडे सर्वांचे लक्ष लागले. त्याचवेळी भारताचा डाव संपल्यानंतर कमेेंंटेेेटरने राहूलला विचारले की, त्यांनी शतक अशा प्रकारे का साजरे केले.

यावर के.एल. राहुलने उत्तर देताना सांगितले की, ते कोणत्याही विशिष्ट व्यक्तीसाठी नव्हते किंवा असा इशारा करून कोणाचा अपमान करायचा नव्हता. इशारा फक्त बाहेरचा आवाज बंद करण्यासाठी होता. तो म्हणाला की काही लोक असे आहेत की जे तुम्हाला कमीपणा दाखविण्याचा प्रयत्न करतात, परंतु तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. हा फक्त एक संदेश होता की, आता आवाज करणे बंद करा.

तो म्हणाला, टी – 20 मालिकेत धावा करता न आल्यामुळे मी खूप निराश होतो, पण खेळ अशाप्रकारेच सुरू असतो . राहुलने आपल्या फलंदाजीबद्दल सांगितले की, काही चांगले शॉट्स लावल्यानंतर दबाव कमी झाला आणि त्यानंतर मी विराट आणि ऋषभशी चांगली भागीदारी करू शकलो आणि संघाची धावसंख्या 336 वर पोहोचली. आम्ही चांगला धावा केल्याचा मला आनंद आहे.