झोपमोड झाल्याने पोलिसाने केले तिघांवर चाकूने वार

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन – रत्नागिरी शहरातील पोलीस उपअधीक्षक बंगल्याजवळच्या पोलीस वसाहतीत होळी पोर्णिमेच्या मध्यरात्री ढोल-ताशे वाजवले जात होते. यामुळे झोपमोड झाल्याने संतापलेल्या एका पोलिसाने तिघांवर चाकूने वार केले. ही घटना पोलीस उपअधीक्षक बंगल्याजवळील पोलीस वसाहतीमध्ये रात्री अडीचच्या सुमरास घडली. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

महेश शंकर मिलके असे या पोलिसाचे नाव असून त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर पोलीस वसाहतीत राहणारे प्रशांत रघुनाथ यादव (वय-४६), अनुराग राजेंद्र माने (वय- २८) आणि शिवाजीनगर येथील प्रशांत प्रकाश मोरे (वय-३६) जखमी झाले. बुधवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली आहे. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आरोपी महेश मिलकेला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस वसाहतीत राहणारा आरोपी महेश मिलके रात्री अडीचच्या सुमारास होळी जाळण्याच्या ठिकाणी आला. त्याने ढोल-ताशे वाजवू नका असे सांगितले यातून होळीजवळील तरुण आणि त्याच्यात बाचा-बाची झाली. या रागातून आरोपीने घरातून चाकू आणून प्रशांत मोरे याच्यावर वार केले. सोडवण्यासाठी आलेल्या अनुराग माने व प्रशांत यादव यांच्यावरही वार केले. शहर पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.