सांगली : ग्रुपच्या वर्चस्ववादातून युवकावर चाकूहल्ला

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

दोन ग्रुपच्या वर्चस्ववादातून बुधगाव (ता. मिरज) येथे एका युवकावर चाकूहल्ला करण्यात आला. ही घटना मंगळवारी (दि.२४) सकाळी दहाच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अजिंक्य इंगळे, साहिल शिकलगार, अभिषेक देसाई, गौरव कोळी, गणेश यमगर, रोहित थोरात, प्रशांत कोळी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकऱणी प्रतीक पाटीलने फिर्याद दिली आहे.
प्रतीक सांगलीतील एका महाविद्यालयात शिकत आहे. बुधगावमध्ये अजिंक्य दादा ग्रुप आणि पाटील ग्रुप असे दोन ग्रुप आहेत. या दोन्ही ग्रुपमध्ये वर्चस्वावरून वाद आहे. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास प्रतीकचा मित्र शोएब मुजावरने प्रतीकला मोबाईलवर संपर्क साधला. त्याने अजिंक्य ग्रुपचे इंगळेसह अन्य संशयित रागाने बघत मारहाण करीत असल्याचे सांगितले.
[amazon_link asins=’B0000AXNMO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d53930c6-8f54-11e8-8af4-a5a8d12c0dee’]
त्यानंतर दहाच्या सुमारास बुधगाव येथील प्रसाद भगत व रोहन पाटील यांनी प्रतीकशी पुन्हा संपर्क साधला. बुधगावमधील जोतीबानगर येथे अजिंक्य ग्रुपच्या मुलांशी पाटील ग्रुपच्या मुलांचा वाद सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रतीकला तेथे बोलावून घेतले. त्यावेळी संशयितांचा प्रतीकच्या मित्रांशी वाद सुरू होता. त्यावेळी प्रतीक भांडण सोडवण्यासाठी गेल्यानंतर शिकलगार, देसाई, कोळी, यमगर यांनी रिंगण करून त्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.

त्यानंतर शिकलगार आणि देसाईने त्याला धरल्यानंतर अजिंक्य इंगळेने त्याच्यावर चाकूने वार केला. तो वार चुकवताना चाकू प्रतीकच्या पाठीत घुसला. त्यानंतर थोरात आणि कोळी यांनीही त्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्यानंतर संशयित निघून गेले. नंतर प्रतीकला त्याच्या मित्रांनी सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सातजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रतीकवर चाकूहल्ला केल्यानंतर त्याच्या पाठीत चाकू रूतून बसला होता. त्याच्या मित्रांनी त्याला त्या अवस्थेतच सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. तेथे शस्त्रक्रिया करून रूतलेला चाकू बाहेर काढण्यात आला. यावेळी प्रतीकसह पाटील ग्रुपच्या समर्थकांनी सिव्हीलबाहेर गर्दी केली होती.