भरमंडपात युवकाचा चाकूने सपासप वार करून खून

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नात मानपानाचे नाट्य नेहमीच पहायला मिळते. मानपानावरून वधू – वर पक्षांमध्ये हाणामारी झाल्याचे देखील पहायला मिळते. मात्र, नागपूरमध्ये डीजेवर नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून एका तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निखील लोखंडे (वय – 26) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमृत लॉन येथे गणेश नंदांवर यांच्याकडे लग्न होते. रात्री साडे नऊच्या सुमारास वर पक्ष डीजेच्या तालावर नाचत लॉनमध्ये पोहोचलं. त्यावेळी वधूपक्षाकडील काही मंडळीही डीजेवर नाचत होती. अचानक गर्दी वाढल्याने तरुणाला धक्का लागला. त्यामुळे वधू आणि वर पक्षांमध्ये वाद होऊन दोन्ही गटात बाचाबाची झाली. यानंतर वाद संपुष्टात आला आणि लग्न सोहळा पार पडला.

मात्र, रात्री बाराच्या सुमारास काही लोकं त्या ठिकाणी आले. त्यांनी वर पक्ष आणि वधू पक्षातील लोकांना मारहाण केली. या मारहाणीत निखील लोखंडे या तरूणावर चाकूने सपासप वार करण्यात आले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या निखीलला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषीत केले. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास कळमना पोलीस करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –