CAA : कोन आहेत प्रिया वर्मा ? केस ओढल्याचा ‘तो’ व्हिडीओ का होत आहे व्हायरल ? (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशच्या राजगडच्या उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा या दिवसांमध्ये चर्चेत आहेत. वास्तविक, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रविवारी राजगडमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ निदर्शने करीत होते. जिल्ह्यात कलम १४४ लागू आहे, त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांना माघार घेण्यास सांगितले, त्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा देखील उपस्थित होत्या. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून एका निषेधकर्त्याने उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा यांचे केस खेचल्याचा आरोप केला आहे. तर प्रिया वर्मा यांच्यावरही निषेध करणार्‍याला चापट मारल्याचा आरोप आहे.

कोण आहेत प्रिया वर्मा :
मध्य प्रदेशातील हा व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रिया वर्मा ट्विटरवर ट्रेंड होत आहेत. राजगड जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा या मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील मांगलिया गावच्या रहिवासी आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतरच प्रिया वर्मा यांनी नागरी सेवेची तयारी सुरू केली. वयाच्या २१ व्या वर्षी डीएसपी झालेल्या प्रिया वर्मा यांनी प्रथम २०१४ साली मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि राज्यातील भैरवगड जिल्ह्यात जेलर म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग झाली. यांनतर केवळ ६ महिन्यांनतर २०१५ मध्ये त्यांना डीएसपी (पोलिस अधीक्षक) पदावर नियुक्त करण्यात आले होते. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या प्रिया वर्मा यांनी २०१७ मध्ये पुन्हा मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. या परीक्षेत प्रिया वर्माने संपूर्ण राज्यात चौथा क्रमांक मिळविला होता. प्रिया वर्मा विवाहित असून त्यांना एक मुलगी आहे.

प्रिया वर्मा अनेकदा आपल्या फेसबुक पेजवर नागरी सेवेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाशी संबंधित महत्वाच्या गोष्टी सांगत असतात. सध्या प्रिया वर्मा आयएएस परीक्षेची तयारी करत आहेत. प्रिया वर्मांचे केस खेचल्याच्या आरोपावरून दोन जणांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका आरोपीला पोलिसांनी अटकही केली आहे. माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवराजसिंह चौहान यांनी ट्वीट केले की, ‘आजचा दिवस लोकशाहीतील सर्वात काळा दिवस म्हणून गणला जाईल. आज राजगडमधील उपजिल्हाधिकारी साहिबा यांनी सीएएच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांना ओढले आणि मारले. या प्रकारची निंदा मी शब्दात करू शकत नाही. त्यांना निदर्शकांना मारहाण करण्याचे आदेश मिळाले का?’

दुसरीकडे काॅंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा यांच्याशी गैरवर्तन केल्याच्या घटनेवर भाजपला घेराव घातला आहे. दिग्विजय सिंह यांनी ट्विट केले की, “राजगडमध्ये भाजपची गुंडागर्दी उघडकीस आली. महिला जिल्हाधिकारी व महिला एसडीएम अधिकाऱ्यांना मारहाण केली, केस ओढले गेले. आम्हाला महिला अधिकाऱ्यांच्या शौर्याचा अभिमान आहे.

फेसबुक पेज लाईक करा –