कामाची गोष्ट ! तुमचं सेव्हींग Account जनधन खात्यामध्ये वर्ग करायचंयः जाणून घ्या ‘ही’ सोपी प्रोसेस
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर जनधन योजना सुरु करण्यात आली आहे. या जनधन खात्यांच्या माध्यमातून अनेक लाभ मिळवता येतात. तुमच्यापैकी अनेकांना जनधन खाते काढायचे असेल पण त्यासाठी काय कागदपत्रे लागतात याची कदाचित माहिती नसेल मात्र आता तुम्हाला याची सर्व माहिती मिळू शकेल.
जर तुमचे बँकेत बचत खाते असेल तर तुम्हीही ते जनधन खात्यात रुपांतरित करू शकता. जनधन खात्यात मिनियम बॅलेन्स ठेवण्याची कोणतीही मर्यादा नाही. तसेच या खात्याच्या माध्यमातून तुम्हाला मोफत जीवन विमा मिळू शकतो. ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध आहे. PMJDY साठी अर्ज करण्यासाठी आपल्याला फक्त एक फॉर्म भरणे गरजेचे आहे. जनधन योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी आपण भारतीय नागरिक असणे अनिवार्य आहे. तसेच 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचे पण अल्पवयीन मुलेही जनधन खाते उघडण्यास पात्र आहेत. संबंधित बँकेत जाऊन केव्हायसी कागदपत्रांसह लेखी अर्ज बँकेला द्यावा लागेल. तसेच रुपे कार्ड मिळवण्यासाठी अर्ज सादर करावा लागेल. याशिवाय बचत बँक खात्याचे जनधन खात्यात हस्तांतरण करण्यासंदर्भातील माहिती द्यावी लागणार आहे.
रुपे डेबिट कार्ड मिळणार
तुमचे जनधन खाते सुरु झाल्यानंतर तुम्हाला रुपे डेबिट कार्ड मिळेल. हे कार्ड मिळाल्यानंतर तीन ते चार दिवसांत बचत खाते जनधन खात्यात रूपांतरित होऊ शकेल. मात्र, यासाठी खातेदाराचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, बँकेच्या शाखेचे नाव, व्यवसाय/रोजगार, अवलंबितांची संख्या, वार्षिक उत्पन्न, नामनिर्देशित, गाव कोड किंवा शहर कोड यासह आधार कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र यांसह काही माहिती विहित नमुन्यात भरणे आवश्यक आहे.