कोण आहेत काँग्रेसचे पुण्यातील उमेदवार मोहन जोशी ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अरविंद शिंदे, प्रवीण गायकवाड, आणि सुरेखा पुणेकर यांच्या नावाची चर्चा होती. असे असताना चर्चेतील नावांव्यतिरीक्त मोहन जोशी यांना पुण्यातून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. मोहन जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून काँग्रेसने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. गेल्या चार दशकांपासून मोहन जोशी हे काँग्रेसमध्ये सक्रीय आहेत. ते काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत.

मोहन जोशी यांचा प्रवास पाहिला तर तो गिरणी कामगार, पत्रकार ते राजकीय नेता असा त्यांचा सर्व प्रवास आहे. मोहन जोशी यांचा जन्म पुण्यात झाला आहे. जोशी यांनी श्री शिवाजी मराठा हायस्कूलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचं 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गिरणी कामगार म्हणून नोकरी केली. त्यानंतर ते पत्रकार म्हणून मराठी वर्तमानपत्रात रुजू झाले.

यावेळी पत्रकारिता करताना त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली. पुणे शहराशी संबंधित अनेक सामाजिक आणि राजकीय मुद्दे त्यांनी तडीस लावले. यावेळी त्यांचा काँग्रेस पक्षाच्या विचारधारेकडे कल वाढला. यानंतर त्यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून 1972-73 च्या सुमारास कामाला सुरुवात केली. मोहन जोशी यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषवले आहे.

याआधी 1999 साली मोहन जोशी यांना काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली हती. त्यावेळी त्यांच्या विरोधात भाजपचे प्रदीप रावत होते. प्रदीप रावत यांनी मोहन जोशी यांचा पराभव केला होता. 2005 मध्ये मोहन जोशी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाली होती. 2008 साली विधानपरिषदेवर आमदार म्हणूनही मोहन जोशी यांची निवड झाली होती.