फाटलेल्या नोटेचा अर्धा तुकडा असला तरी पैसे मिळणारच, जाणून घ्या नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेकवेळा जीर्ण झालेल्या नोटा पैशांची देवाण-घेवाण करताना फाटतात. नोट फाटल्याने पैसे फुकट गेले असा अनेकांचा समज असतो. पण, जुन्या किंवा फाटलेल्या नोटा या रिझर्व्ह बँकेकडून (RBI) बदलून घेता येतात. केव्हा केव्हा फाटलेल्या नोटेचा अर्धा भागच शिल्लक राहतो, मात्र असे असले तरी तुम्ही रिझर्व्ह बँकेकडून पैसे मिळवू शकता. तुमच्याकडे नोटेचा जेवढा भाग शिल्लक आहे, त्यानुसार रिझर्व्ह बँक पैसे परत देते.

अर्धवट फाटलेल्या नोटांनाही मूल्य असते, असा RBI चा नियम आहे. परंतु, हा नियम प्रत्येक नोटेसाठी वेगवेगळा आहे. RBI च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, १ ते २० रुपये मूल्यांची नोट अर्धवट फाटली असेल तर त्याचे अर्धे मूल्य मिळू शकत नाही. अशा स्थितीत या नोटांचे पूर्ण मूल्य देण्यात येते. मात्र, ५० रुपये ते २००० रुपयांच्या नोटा फाटल्या असतील तर तुम्हाला अर्धी रक्कम परत मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल…

>> एक (१) रुपयांची नोट ही ६१.११ सेंटीमीटर स्क्वेअर आकाराची असून, त्याचा ३१ सेंटीमीटर स्क्वेअर भाग असल्यास पूर्ण पैसे परत मिळतात.

>> दोन (२) रुपयांची नोट ६७.४१ सेंटीमीटर स्क्वेअर आकाराची असून, त्याचा ३४ सेटींमीटर भाग असल्यास पूर्ण पैसे परत मिळतात.

>> पाच (५) रुपयांची नोट ही ७३.७१ सेंटीमीटर स्क्वेअर आकाराची असून, त्याचा ३७ सेंटीमीटर भाग असल्यास पूर्ण पैसे परत मिळतात.

>> दहा (१०) रुपयांची नोट ८६.३१ सेंटीमीटर स्क्वेअर आकाराची असून, त्याचा ४४ सेटींमीटर भाग असल्यास पूर्ण पैसे परत मिळतात.

>> वीस (२०) रुपयांची नोट ९२.६१ सेंटीमीटर स्क्वेअर आकाराची असून, त्याचा ४४ सेंटीमीटर भाग असल्यास पूर्ण पैसे परत मिळतात.

५० ते २००० रुपयांच्या फाटलेल्या नोटांसाठी वेगळा नियम आहे.
>> पन्नास (५०) रुपयांच्या नव्या आणि जुन्या नोटांसाठी वेगवेगळे नियम आहेत. जुन्या नोटेचा ४३ सेंटीमीटर स्क्वेअर आणि नव्या नोटेचा ३६ सेंटीमीटर स्क्वेअर हिस्सा असेल तर अर्धी रक्कम परत मिळते.

>> शंभर (१००) रुपयांच्या नव्या आणि जुन्या नोटांबाबत सुद्धा वेगळे नियम आहेत. जुन्या नोटेचा ४६ सेंटीमीटर स्क्वेअर आणि नव्या नोटेचा ७५ सेंटीमीटर स्क्वेअर हिस्सा असेल तर अर्धी रक्कम परत मिळते.

>> दोनशे (२००) रुपयांची नोट ९६.३६ सेंटीमीटर स्क्वेअर आकाराची असून, त्याचा ७८ स्क्वेअर मीटर भाग असल्यास तुम्हाला पूर्ण पैसे परत मिळतात. तर ३९ सेंटीमीटर स्क्वेअर भाग असल्यास अर्धेच पैसे मिळतात.

>> पाचशे (५००) रुपयांची नोट ९९.०० सेंटीमीटर स्क्वेअर आकाराची असून, नोटेचा ८० सेंटीमीटर भाग असल्यास पूर्ण पैसे मिळतात. मात्र, तुमच्याकडे फक्त ४० सेंटीमीटर स्क्वेअर हिस्सा असेल तर अर्धेच पैसे परत मिळतील.

>> दोन हजार (२०००) रुपयांची नोट १०९.५६ सेंटीमीटर स्क्वेअर आकाराची असून, त्याचा ८८ सेंटीमीटर भाग असल्यास तुम्हाला पूर्ण पैसे मिळतील. तर ४४ सेंटीमीटर हिस्सा असल्यास तुम्हाला अर्धेच पैसे मिळतील.