सप्टेंबर 2020 मध्ये आश्चर्यकारक ग्रह स्थिती, 400 वर्षांनी अत्यंत अद्भूत दुर्मीळ योग ?, प्रमुख 6 ग्रह स्वगृही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्योतिशीय गणना आणि पंचांगानुसार सप्टेंबर महिना अगदी अद्भूत ठरत आहे. सप्टेंबर महिन्यात नवग्रहांपैकी सात ग्रह राशीबदल करत आहेत. सूर्य, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, राहु आणि केतु हे मार्गी आणि वक्री चलनाने राशीपरिवर्तन करणार आहेत. यापैकी सूर्य, गुरु, बुध, शुक्र यांचे चलन मार्गी असेल. तर मंगळ, राहु आणि केतु यांचे चलन वक्री असेल. ज्योतिषशास्त्रानुसार राहु आणि केतु हे दोन छाया ग्रह मानण्यात आले असून, या दोन ग्रहांचे चलन कायम वक्रीच असते. वक्री म्हणजेच ते चलनानेच राशीपरीवर्तन वा गोचर करतात, असे सांगितले जाते. सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर अद्भूत ज्योतिषीय घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

रविवार, 13 सप्टेंबर 2020 आणि सोमवार 14 सप्टेंबर 2020 या दोन दिवशी नवग्रहांपैकी तब्बल, सहा ग्रह आपले स्वामीत्व असलेल्या राशीत विराजमान आहेत. काही मान्यता आणि मतप्रवाहांनुसार, असा योग अत्यंत अद्भूत आणि दुर्मीळ मानला जात असून, असा योग यानंतर तब्बल 400 वर्षांनी जुळून येऊ शकतो, असा अंदाज बांधला जात आहे. यापूर्वी मे महिन्यात नवग्रहांपैकी अगदी 15 दिवसांच्या अंतराने तब्बल 6 ग्रह वक्री गेले होते. यानंतर आता सप्टेंबर महिन्यात सहा ग्रह हे आपले स्वामीत्व असलेल्या राशीत म्हणजेच उच्च राशींत स्वगृही विराजमान आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार, कोणताही ग्रह आपले स्वामीत्व असलेल्या राशीत विराजमान असला की, तो सर्वाधिक प्रभावशाली असतो. सप्टेंबर महिन्यातील या दोन दिवशी अत्यंत प्रभावशाली असल्याचे शास्त्र मानते. नेमके कोणते ग्रह स्वगृही आहे, ही स्थिती कधीपर्यंत असेल, जाणून घ्या…

सूर्य सिंह राशीत विराजमान
ग्रहांचा राजा असलेला सूर्य आताच्या घडीला आपले स्वामीत्व असलेल्या सिंह राशीत विराजमान आहे. ऑगस्ट महिन्यात कर्क राशीतून सूर्य मार्गी चलनाने आपले स्वामीत्व असलेल्या सूर्य राशीत विराजमान झाला आहे. आता यानंतर बुधवार 16 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी 7 वाजून 7 मिनिटांनी सूर्य सिंह राशीतून कन्या राशीत विराजमान होणार आहे. सूर्य हा करिअर, सुख, समृध्दी, प्रगती याचा कारक मानला गेला आहे. सूर्याचे हे राशीपरिवर्तन बहुतांश व्यक्तीसाठी शुभ मानले जाते.

चंद्र कर्क राशीत विराजमान
चंद्र ग्रह मार्गी चलनाने एका राशीतून दुसऱ्या राशीत विराजमान होत असतो. चंद्राचे चलन हे गतीमान असते. एखाद्या राशीत चंद्र अधिक काळ स्थिरावत नाही. रविवार, 13 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 10.36 वाजता चंद्र मिथुन राशीतून आपले स्वामीत्व असेलेल्या कर्क राशीत विराजमान झाला. चंद्राच्या या राशीपरिवर्तनामुळेच सदर अद्भूत आणि दुर्मीळ योग जुळून आला आहे. यानंतर मंगळवार 15 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 2.24 वाजता चंद्र राशीपरीवतून करेल. हा दुर्लभ योग मंगळवार दुपारपर्यंत असणार असल्याचे सांगितले जात आहे.

मंगळ मेष राशीत विराजमान
ग्रहांचा सेनापती मानलेला मंगळ आपले स्वामीत्व असलेल्या मेष राशीत विराजमान आहे. गुरुवार 10 सप्टेंबर 2020 रोजी मंगळ मेष राशीत वक्री गेला आहे. यापूर्वी रविवार 16 ऑगस्ट 2020 रोजी मंगळ मीन राशीतून मार्गी चलनाने मेष राशीत विराजमान झाला होता. आता रविवार 4 ऑक्टोबर 2020 पर्यंत मंगळ वक्री चलनाने मेश राशीत विराजमान असेल. त्यानंतर 13 नोव्हेंबर 2020 रोजी पुन्हा एकदा वक्री चलनाने मेष राशीतून मीन राशीत विराजमान होईल. आगामी सुमारे 66 दिवस मंगळ वक्री असेल असे सांगितले जात आहे.

बुध कन्या राशीत विराजमान
बुद्धीकारक मानला गेलेला बुध आपले स्वामीत्व असलेल्या कन्या राशीत विराजमान झालेला आहे. बुधवार 20 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 12.03 वाजता बुध मार्गी चलनाने सिंह राशीतून कन्या राशीत आला आहे. बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला गेला आहे. बुध ऑगस्ट महिन्यात कर्क राशीतून सिंह राशीत विराजमान झाला होता. आताच्या घडीला बुध कन्या राशीत आहे. यानंतर मंगळवार 22 सप्टेंबर 2020 रोजी बुध मार्गी चलनाने तुळ राशीत प्रवेश करेल. बुधाचे मार्गी चलन बहुतांश राशीला फलदायी मानले जाते.

गुरु धनु राशीत विराजमान
ग्रहांचा देवता मानला गेलेला गुरु रविवार 13 सप्टेंबर 2020 रोजी गुरु आपले स्वामीत्व असलेल्या धनु राशीत मार्गी झाला आहे. यापूर्वी 30 जून 2020 रोजी गुरु वक्री चलनाने शनीचे स्वामीत्व असलेल्या मकर राशीतून आपले स्वामीत्व असलेल्या धनु राशीत वक्री चलनाने विराजमान झाला होता. गुरु करिअर आणि सुख, समृद्धीकारक मानला गेला आहे. तसेच धन, सोने, आणि सुविधांचाही गुरु कारक मानला गेला आहे. गुरुचे मार्गी चलन बहुतांश राशीला फलदायी ठरते.

शनि मकर राशीत विराजमान
नवग्रहांमध्ये न्यायाची देवता म्हणून शनीकडे पाहिले जाते. मे महिन्यात आपले स्वामीत्व असलेल्या मकर राशीत शनी वक्री गेला होता 11 मे 2020 रोजी शनी आपलेच स्वामीत्व असलेल्या मकर राशीत वक्री गेला. शनी कृषी क्षेत्र, रोजंदारी, अवजड उद्योग आणि यांत्रिक क्षेत्रावर प्रभाव पाडणारा मानला जातो. तसेच शनी महाराज नोकरदार वर्ग आणि रोजंदारी करणाऱ्या व्यक्तीचे प्रतिनिधित्व करतात, असेही सांगितले जाते. आताच्या घडीला धनु, मकर आणि कुंभ या राशीच्या व्यक्तींची साडेसाती सुरु आहे. धनु राशीच्या व्यक्तींची साडेसाती शेवटच्या टप्प्यात आहे. मकर राशीच्या व्यक्तींचा साडेसातीचा काळ मधल्या टप्प्यात आहे. तर कुंभ राशीच्या व्यक्तींची साडेसाती अलीकडेच सुरु झाली आहे.