Astrology Prediction 2021 : 59 वर्षांनी अद्भूत योग ! मकर राशीत एकाच वेळी 6 ग्रह, भारतासह जगभरात होणार ‘हे’ मोठे बदल ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    फेब्रुवारी 2021 मध्ये एक अद्भूत आणि दुर्लभ योग जुळून येत आहे. क्वचित येणारा असा हा योग आगामी काही शतकांवर आपला प्रभाव पाडणारा ठरू शकेल असं सांगितलं जात आहे. हा योग काय आहे, याचा नेमका काय परिणाम होणार आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

मेदिनी ज्योतिषशास्त्रानुसार एकाच राशीत 5 किंवा त्यापेक्षा जास्त ग्रह (राहु आणि केतू वगळता) एकाचवेळी विराजमान झाले तर त्याचा देश आणि जागतिक स्तरावर मोठा परिणाम घडू शकतो. या योगामुळं अशा काही घटना घडतात ज्याचा परिणाम पुढील काही शतकापर्यंत राहू शकतो. विशेष म्हणजे सुर्य, गुरू, शनी, मंगळ, बुध आणि शुक्र असे ग्रह एकाच राशीत विराजमान झाले तर युद्धजन्य स्थिती निर्माण होते. मोठी उलथापालथ होऊ शकते. मोठं जनआंदोलन उभं राहू शकतं. मोठी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. देवऋषी नारद यांनी रचलेल्या मयुर चित्रम नावाच्या ग्रंथात यासंदर्भात उल्लेख असल्याचं सांगितलं जातं.

फेब्रुवारी 1962 साली मकर राशीत एकाच वेळी 7 ग्रह विराजमान झाले होते. याचा परिणाम म्हणजे महाशक्ती मानली जाणारी अमेरिका आणि रशिया यांच्यात क्युबा मिसाईलवरून मोठा वाद झाला होता. तिसऱ्या विश्वयुद्धाची नांदी ठरेल असा तणाव निर्माण झाला होता. यामुळं अनेक दशकांपर्यंत शीत युद्धाची स्थिती निर्माण झाली होती. यानंतर सप्टेंबर 1979 मध्ये सिंह राशीत 5 ग्रह एकाचवेळी विराजमान झाले होते. या योगामुळं इस्लामिक क्रांतीनं मुस्लिमबहुल देशात मोठ्या घडामोडी घडवल्या. या दोन्ही घटना आगामी काही शतकांपर्यंत लक्षात राहतील अशा आहेत.

गेल्या वर्षी म्हणजेच डिसेंबर 2019 मध्ये धनु राशतीत सुर्य ग्रहणावेळी 5 ग्रह एकाच राशीत विराजमान झाले होते. कोरोना आणि आर्थिक मंदीचा हाहाकार पूर्ण जगात पाहायला मिळाला. अद्यापही अनेक देश यातून सावरलेले नाहीत. या क्रमात पुढील वर्षी फेब्रुवारी 2021 मध्ये मकर राशीत एकाचवेळी सुर्य, चंद्र, बुध, शुक्र, गुरू आणि शनी असे 6 ग्रह विराजमान असतील.

मेदिनी ज्योतिषशास्त्रानुसार, पुढील वर्षी निर्माण होणाऱ्या ग्रहमानाचा भारतावर विशेष करून प्रभाव पडू शकेल. स्वतंत्र भारताची रास मकर आहे. फेब्रुवारी 2021 मधील ग्रहमान भारतासाठी कष्टकारक ठरेल. आर्थिक मंदी, कोरोना संकट आणि भारत-चीन सीमावाद अशा अनेक गोष्टींसोबत एकाच वेळी लढत आहे. या अद्भूत आणि दुर्लभ योगामुळं, मोठे कायदेशीर बदल, बेरोजगारी, महागाई, राजकीय आणि सामाजिक आंदोलनं अशा काही घटना घडू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र ग्रहांची ही महायुती शेतकरी बांधवांसाठी अतिशय शुभ आणि उत्तम लाभदायक ठरू शकेल असं सांगितलं जात आहे.

भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तान आणि चीनला पुढील वर्षांच्या आरंभी मोठं नुकसान करणाऱ्या काही घटनांना सामोरं जावं लागू शकतं. पाकची चंद्र रास मिथून असून, अष्टम म्हणजेच विनाशस्थानी या ग्रहांची स्थिती मोट्या भुकंपाचा संकेत देते. यामुळं पाकला मोठं नुकसान संभवते आहे. तर चीनमध्ये आर्थिक संकटामुळं असंतोष पसरू शकतो. चीनचा शेअर बाजार कोसळल्याचा फटका जागतिक स्तरावरील धन कुबेरांना बसू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.