Kawasaki Desease : ‘कावासाकी’ अन् ‘कोरोना’चं काय कनेक्शन ? जाणून घ्या या आजाराबद्दल सर्व काही !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  सध्या देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोना रुग्णांची आकडेवारी ही दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच आता कावासाकी या आजारानं पालकांची चिंता अधिकच वाढवली आहे. हा आजार लहान मुलांमध्ये आढळून येतो. याचे रूग्ण आता भारतातही आढळून येत आहेत. आज आपण कावासाकी या आजाराची तीव्रता, त्याचं स्वरूप आणि लक्षणं तसेच, हा आजार कधी बरा होतो, याला किती खर्च येतो अशी सविस्तर माहिती घेणार आहोत.

कावासाकी आजार नेमका आहे तरी काय ? काय आहेत याची लक्षणं ?

कोरोना संसर्गाच्या काळात नव्हे तर कोरोनामुक्त झाल्यानंतर किंवा कोरोनातून बरे झाल्यानंतर मुलांमध्ये 3-4 आठड्यांनंतर कावासाकीसदृश आजार होतो. हा आजार नवा नाही तर 40-50 वर्षे जुना आहे. कावासाकी हा आजार 5 वर्षांखालील मुलांना होतो. परंतु कोरोनानंतर आता 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांनाही हा आजार होत आहे. कावासाकी आजार झाला तर मुलांचा रक्तदाब कमी होतो. किडनीवर परिणाम होतो. त्यांना आयसीयुचीही गरज भासू शकते.

कोरोनानंतरच्या कावासाकीसदृश आजाराची लक्षणे कोणती ?

– अंगावर लालसर चट्टे

– ताप

– चिडचिड करणे

– अस्वस्थ वाटणे

लहान मुलांना कोरोना संसर्गाच्या 3-4 आठवड्यांनंतर ही लक्षणे आढळतात. त्यामुळं जर लहान मुलांना कोरोनाची लागण झाली असेल तर त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं. ही लक्षणे आढळली तरी पालकांनी घाबरून जाऊ नये. कारण केवळ ही लक्षणं म्हणजे कावासाकी आजार नसून कावासाकीसदृश आजारही असू शकतो. याचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळं घाबरून न जाता अशी लक्षणं आढळल्यास तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असेल तर कोरोना होत नाही असं म्हटलं जातं. कावासाकीबाबतीत असं काही आहे का ?

अद्याप तरी अशी कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. युरोप आणि अमेरिकेत 3-4 महिन्यांपासून कावासाकीच्या केसेस समोर येताना दिसत आहेत. तिथेही आणि आपल्याकडे रुग्णांची संख्या कमी आहे. आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर अमेरिकेत 200 तर ब्रिटनमध्ये 120 जाणांना कावासाकी आजार झाला आहे. कुपोषण, लठ्ठपणा यामुळंही कावासाकी झाला आणि अशाच मुलांना हा आजार होतो असं अद्याप तरी सिद्ध झालेलं नाही. ज्यांना बीपी आण डायबिटीज आहे त्यांना कोरोनाची लागण होते. तसं कावासाकीचं नाही. ज्यांना हा आजार झाला आहे ती मुलं तंदुरूस्त होती. म्हणून कावासाकीवर लवकरात लवकर उपचार करणं हेच सध्या आपल्या हातात आहे.

किती गंभीर आहे कावासकी ? शरीरावर कोणते परिणाम होतात ?

या आजारात हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांना सूज येत असते. ही सूज जर कमी झाली नाही तर गाठी निर्माण होण्याचाही धोका असतो. असं जर झालं तर हृदयाच्या रक्तपुरवठ्यावर परिणाम होतो. यामुळं हृदयाला मोठा धोका पोहोचू शकतो. जर स्थिती गंभीर झाली तर ओपन हार्ट सर्जरीही करावी लागू शकते. किडनीवरही परिणाम होतो आणि याचा धोका इतर अवयवानांही पोचू शकतो. जर यावर उपचार करण्यासाठी उशीर झाला तर हा आजार जीवघेणा ठरू शकतो.

कावासाकीची लक्षणं आढळली तर काय करावं ?

जर कावासाकी आजाराची लक्षणं आढळून आली तर तत्काळ बालरोगतज्ज्ञांशी संपर्क साधायला हवा. त्या डॉक्टरांनी याची माहिती आयसीयुची सुविधा असलेल्या रुग्णालयांना देणं गरजेचं आहे. जर याची लागण झालेल्या मुलांना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तर व्यवस्थित उपचार मिळू शकतात. कारण अशावेळी आयसीयु टीम, कार्डिओ स्पेशालिस्ट, किडनी स्पेशालिस्ट, रिनल स्पेशालिस्ट अशा सगळ्यांची गरज भासू शकते.

कावासाकी किती दिवसात बरा होतो ?

कावासाकी हा आजार साधारणपणे 7-10 दिवसात बरा होतो. अमेरिका, ब्रिटन आणि भारतात ज्या केसेस समोर आल्या आहेत त्यावरून हेच लक्षात आलं आहे की, कावासाकी या आजारावर वेळेवर उपचार घेणं खूप गरजेचं आहे. वेळेत उपचार घेतल्यानंतर स्थिती लवकर सुधारते. मात्र पुढेही फॉलोअप घ्यावा लागतो.

कावासाकी आजाराच्या उपचारासाठी किती खर्च येतो ?

कावासाकी आजाराची तीव्रता किती आहे यावर त्याचा उपचार आणि त्याला येणारा खर्च अवलंबून असतो. जर या आजाराची केवळ सुरूवात असेल तर फक्त स्टेरॉई़ड्स वापरूनही मुलं बरी होतात. परंतु जर स्थिती गंभीर झाली आणि हृदयाच्या रक्तपुरवठ्यावर जर याचा परिणाम झाला तर इम्युनोग्लोबलिनचा वापर करावा लागतो. 5 ग्रॅम इम्युनोग्लोबलिनची किंमत ही 15 ते 20 रुपये इतकी आहे. रुग्णाचं वजन किती आहे यावर इम्युनोग्लोबलिनचा वापर ठरलेला असतो. याचं प्रमाण 1 किलोमागे 2 ग्रॅम असं आहे. म्हणजेच रुग्णाचं वजन जर 10 किलो असेल तर 20 ग्रॅम इम्युनोग्लोबलिनची गरज पडते. यासोबत आयसीयुचा देखील खर्च असतो.

आपली यंत्रणा कावासाकीसाठी किती सज्ज आहे ?

कावासाकी आजार झाला तर मुलांना आयसीयुची गरज भासू शकते. आपल्याकडे प्रत्येक 10 आयसीयु बेडमागे 1 बेड लहान मुलांसाठी असतो. बाकीचे बेड हे प्रौढांसाठी असतात. कावासाकी झालेल्या प्रत्येकाला आयसीयुची गरज पडेलच असं नाही. कोरोना वेगानं पसरतो. कावासाकी पसरत नाही. कारण विषाणू तुमच्या शरीरातून गेल्यानंतर त्याचे परिणाम म्हणजे कावासाकी आजार आहे. विषाणू शरीरात नसल्यानं हा आजार पसरत नाही त्यामुळं सुदैवानं रुग्णांची संख्या खूप कमी आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या मुलांना कावासाकी होण्याची शक्यता जास्त असते. जर घरातील एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह असेल तर त्यांच्या माध्यमातून मुलांना कावासाकी होऊ शकतो. म्हणून काळजी घेणं आवश्यक आहे.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.