खाण्याच्या पानांमुळे होतील केस गळती आणि पिंपल्सच्या समस्या दूर, ‘या’ पध्दतीनं करा वापर

पोलीसनामा ऑनलाइन – सध्याच्या व्यस्त जीवशैलीमुळे आणि बदलत्या वातावरणामुळे त्वचा कोरडी पडणे केस गळणे यांसारख्या समस्या उद्भवतात. या समस्यांचा सामना करण्यासाठी आपण बाजारात उपलब्ध असलेली महागडी उत्पादन वापरण्यास सुरुवात करतो. त्यामध्ये कोल्ड क्रीम, बॉडी लोशन अशा उत्पादनांचा समावेश करतो. मात्र, एवढं वापरून देखील मनासारखी त्वचा आपणास मिळत नाही. तसेच दररोज कामासाठी बाहेर पडत असताना आणि ऑफिसला जात असताना प्रत्येकाला आकर्षक दिसावंस वाटतं. म्हणून आज आम्ही तुम्हाला खाण्याचे पान सुंदर त्वचा तसेच इतर गोष्टींकरता कसे वापरता येईल याबाबत माहिती सांगणार आहोत.

१. केस गळणं थांबत

सातत्याने तुमचे केस गळत असतील तर खाण्याच्या पानांचा वापर करुन तुम्ही केस गळणे थांबवू शकता. त्यासाठी खाण्याची पानं आधी स्वच्छ धुवून घ्या. नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. मग त्या पानांना तिळाच्या अथवा नारळाच्या तेलात मिक्स करुन केसांच्या मुळांना लावा. एक तास ठेवल्यानंतर केस धुवून टाका. आठवड्यातून दोनदा हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल.

२. पिंपल्स कमी होतात.

खाण्याच्या पानात अ‍ॅन्टी बॅक्टिरीयल गुण असतात. त्याच्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग, मुरुम निघून जाण्यास मदत होते. त्यासाठी खाण्याची पानं पाण्यात भिजवून ठेवा. नंतर ती बारीक दळून घ्या. दळून झाल्यानंतर त्यात हळद घाला आणि त्याची पेस्ट बनवून चेहऱ्याला लावा. १० मिनिटांनी चेहरा धावून घ्या. दिवसातून दोन वेळा हा प्रयोग केल्यास पिंपल्सची समस्या दूर होऊन जाईल.

३. शरीराची दुर्गंधी दूर करण्यास मदत करते.

दिवसभर कामात आणि प्रवासात असताना खूप घाम येतो. अशावेळेस अंगाला येणाऱ्या दुर्गंधीपासून वाचण्यासाठी खाण्याची पानं फायदेशीर ठरु शकतात. अंघोळीच्या पाण्यात या पानांचं तेल घातल्यास ही समस्या निर्माण होणार नाही.

४. खाजेपासून आराम मिळतो.

पावसाळा आणि हिवाळा या दोन ऋतूमध्ये शरीरावर खूप खाज सुटते. खाजेपासून सुटका करण्यासाठी खाण्याची पानं फायदेशीर ठरतात. त्यासाठी पाण्यात ९ ते १० पानं घालून उकळून घ्या. मग ते पाणी अंघोळीसाठी वापरा.