सुशांत सिंह राजपूतच्या निधनावर PM मोदींनी व्यक्त केलं दु:ख, म्हणाले – ‘एक उज्ज्वल अभिनेता खुपच लवकर निघून गेला’

नवी दिल्ली : देशात कोरोना काळात फिल्म अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली आहे. सुशांत सिंहच्या मृत्यूने प्रत्येकाला धक्का बसला आहे. बॉलीवुड, राजकारण, क्रीडा, प्रत्येक क्षेत्रातील लोक स्तब्ध झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेते दिपेंद्र हुड्डा यांनी सुशांतच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.

मोदींनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त करताना लिहिले आहे की, सुशांत सिंह राजपूत… एक उज्ज्वल युवा अभिनेते… खुपच लवकर गेले. त्यांनी टीव्ही आणि चित्रपटात खुप चांगले काम केले. मनोरंजनाच्या जगतात त्यांच्या उदयाने अनेकांना प्रेरणा दिली आणि अनेक भूमिकांमुळे ते नेहमी आठवणीत राहतील. त्यांच्या निधनाने मी पूर्णपणे स्तब्ध आहे. त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ओम शांती.

तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, भारताचा उगवता तारा सुशांत सिंह राजपूत यांच्या दु:खद आणि धक्कादायक मृत्यूने त्यांच्या लाखो चाहत्यांना मोठे दु:ख झाले आहे. सुशांत यांचे फिल्म आणि टीव्हीचे शानदार करियर नेहमी आठवणीत राहील. यासोबतच केजरीवाल यांनी सुशांतला श्रद्धांजली अर्पण करत म्हटले की, या दु:खात मी त्यांचे मित्र आणि कुटुंबियांच्या सोबत आहे.

तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लिहिले आहे की, हिंदी चित्रपटातील युवा कलाकार सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूचे वृत्त स्तब्ध करणारे आहे. त्यांची अभिनय क्षमता, प्रतिभा आणि कौशल्य मोठे होते. त्यांचे असे जाणे दुखदायक आहे. यामुळे फिल्म जगताचे मोठे नुकसान झाले आहे. ईश्वराने त्यांच्या आत्म्यास शांती द्यावी, आणि त्यांच्या परिवाराला दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी.

सुशांत सिंह यांच्या निधनावर भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांनी ट्विटरवर म्हटले की, युवा अभिनेते सुशांत सिंह यांच्या जाण्याने मी दु:खी आहे. ते इतकं चांगलं करत होते…अखेर त्यांनी असे का केले.

तर काँग्रेसचे माजी खासदार दिपेंद्र हुड्डा यांनी सुशांतने अभिनय केलेल्या महेंद्र सिंह धोनी चित्रपटातील छायाचित्र पोस्ट करून लिहिले आहे की, ही अतिशय धक्कादायक बातमी आहे. परमेश्वराने या कठिण काळात त्यांच्या परिवाराला शक्ती द्यावी. यासोबतच त्यांनी लिहिले की, धोनीसह अनेक चित्रपटातील त्यांच्या चांगल्या अभिनयासाठी लक्षात ठेवले जाईल.