Coronavirus : ‘कोरोना’ संकटादरम्यान दिलासा ! जाणून घ्या ‘कुठं’ अन् ‘किती’ रूग्ण झाले ‘बरे’, कोणत्या औषधानं होतोय ‘उपचार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात देखील या रोगाने शिरकाव केला आहे. भारतामध्ये या रोगाचा फैलाव होत असून भारतामध्ये आत्तापर्यंत हजाराच्या आसपास लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी कोरोनाशी लढण्यासाठी युद्ध पातळीवर उपाय योजना केल्या आहेत. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन केला आहे. कोरोनामुळे नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण आहे. याच दरम्यान एक दिलास देणारी बातमी येत आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या रोगापासून बरे होणाऱ्या रुग्णांची देखील संख्या वाढत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांवर अनेक औषधांचा योग्य उपयोग होत आहे.

बरे झाले रुग्ण
भारतात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेले अनेक रुग्ण बरे झाले आहेत. भारतात 67 रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. हा आकडा आरोग्य मंत्रालयाने जाहीर केला आहे. कोरोना व्हायरस ज्या ठिकाणाहून सुरु झाला होता त्या ठिकाणचे लोक लवकर बरे झाले आहेत. चीनमध्ये 74 हजार 588 लोक कोरोना व्हायरसपासून मुक्त झाले आहे. तर अमेरिकेत 1868 संक्रमीत रुग्ण बरे झाले आहेत. स्पेनमध्ये 7015 रुग्ण ठिक झाले आहेत तर जर्मनीमध्ये 5673 लोक बरे झाले आहेत.

कोरोनावर औषध बनवण्याचा सिप्ला कंपनीचा दावा
कोरनावर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नाही. चीन, अमेरिका या देशांसह भारत देखील कोरोनावर औषध बनवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतातील प्रसिद्ध औषध कंपनी सिप्ला ने सहा महिन्यात कोरोनावर औषध निर्माण करण्याचा दावा केला आहे. जर असे झाले तर या व्हायरसवर औषध बनवणारी ही पहिली भारतीय कंपनी असेल. दरम्यान फ्रान्सने लस बनवण्याचा आणि 6 दिवसात संक्रमीत रुग्णाला बरे करण्याचा दावा केला आहे. परंतु अद्याप याची टेस्ट घेण्यात आलेली नाही. चीनच्या अ‍ॅकेडमी ऑफ मिलेटरी मेडिकल सायन्सने कोरोनावरील लस बनवले आहे. मात्र याची टेस्ट घेण्यासाठी क्वारंटाईन रुग्णाची गरज आहे. तसेच अमेरिकाने जर्मनच्या CureVac या कंपनीला अमेरिकेत औषध बनवण्याचे आमंत्रण दिले आहे. अनेक अमेरिकन वैज्ञानिक कोरोनावर लस तयार करण्याच्या कामाला लागले आहे. जर्मनीमध्ये BioNTech कंपनीचे वैज्ञानिक कोरोना व्हायरसवरील लस बनवण्यात जवळपास यशस्वी झाले आहेत.

कोरोना उपचारात 7 औषध प्रभावी
जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी लस आणि औषध शोधण्यात गुंतले आहेत. दरम्यान दिलासा देणारी बातमी अशी आहे की, यापूर्वी आलेल्या इतर रोगांची सात औषधे या कोरोनाच्या उपचारात फायदेशीर ठरत असल्याचे आढळून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील या औषधाची चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. सात रोगांवर वापरण्यात आलेल्या औषधांपैकी दोन औषधे भारतात वापरण्याचा सल्ला आयसीएमआरच्या डॉक्टरांनी दिला आहे.

इंटरनॅशनल जर्नल ऑफ एन्टीमाक्रोबियल एजंट्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधन अहवालानुसार मलेरियाचे औषध क्लोरोक्विनला प्रतिजैविक अ‍ॅझिथ्रोमाइसिन कोरोनावर उपचारात मदत होऊ शकते असा दावा करण्यात आला आहे. कोरोनाची लागण झालेला रुग्ण या औषधामुळे सहा दिवसांत बरा होतो हे संशोधनातून आढळून आले आहे.

कोरोनाच्या उपचारात क्लोरोक्विनसह अझिथ्रोमाइसिन देखील परिणाम कारक औषध आहे. आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार दोन अँटी रेट्रो व्हायरल ड्रग्ज म्हणजे लोपीनावीर आणि रोटोनाविर याचा वापर केला तर फायदाचा ठरतो. याचा उपयोग एचआयव्हीच्या उपचारात केला जातो. भारत, चीन या देशांसह अनेक देशांनी या औषधाचा वापर कोरोनाग्रस्तावर केला असून याचा फायदाही झाला आहे.
जपानी फ्ल्यूवरील औषध फविपिरावीर हे कोरोनाच्या उपचारातील प्रभावी औषध आहे. या औषधामुळे कोरोनाचे रुग्ण चार दिवसांत बरे होतात असा दावा करण्यात आला आहे.

कोरोनामध्ये इबोलो औषध रीमॅडेव्हिव्हिर देखील प्रभावी आहे.
काही देशांमध्ये बर्ड फ्ल्यू वरील टेमिफ्ल्यू हे औषधाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.
बहुतांश देशामधील रुग्णालयामध्ये या सात औषधांचा वापर केला जात आहे. मात्र अद्याप कोरोनावर कोणतेही अधिकृत औषध तयार झालेले नाही. यासाठी जगभरातील अनेक रुग्णाची बरेच दिवस तपासणी करवी लागणार आहे. यासाठी डब्ल्यूएचओने पुढाकार घेतला आहे.