Coronavirus : ‘या’ राज्यातील जेलमधील बंद कैदी बनवत आहेत ‘कोरोना’पासून बचावासाठी ‘मास्क’

नवी दिल्ली : चीननंतर जगातील 136 देश कोरोना व्हायरसच्या संसर्गाने त्रस्त आहेत. चीनने आता जवळपास कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवले आहे. चीनमध्ये कोरोना रूग्णांसाठी बनवलेली तात्पुरती रूग्णालये सुद्धा बंद करण्यात आली आहेत. जे रस्ते बंद करण्यात आले होते, ते आता खुले करण्यात येत आहेत. चीन पुन्हा आपल्या गतीने काम करण्यास सुरूवात करत आहे. सध्या ज्या देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे, ते देश बचावाची तयारी करत आहेत. मास्क आणि सॅनिटायझरची पूर्तता वाढवली जात आहे. केरळच्या कारागृहांमधील कैदी सध्या मास्क बनवण्याचे काम करत आहेत.

जेव्हा चीनमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरला होता, त्या दरम्यान तेथेही मास्क आणि सॅनिटायझरची कमतरता जाणवत होती, त्यावेळी दुसर्‍या देशांनी चीनला मास्क आणि सॅनिटाझजर पुरवले होते. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसला महामारी घोषित केली आहे आणि सर्व देशांना त्यापद्धतीने पावले उचलण्यास सांगितले आहे. भारतात सुद्धा कोरोना रूग्णांची संख्या सतत वाढत आहे. येथेही अनेक राज्यात मास्क आणि सॅनिटायझरची कमतरता जाणवत आहे, यादरम्यान काही लोकल कंपन्यांनी आपले प्रॉडक्शन वाढवले आहे, परंतु ते दर्जानुसार नाही. काही बनावट कंपन्यादेखील संधीचा फायदा घेत आहेत, अशा कंपन्यांवर कारवाई होत आहे.