… म्हणून आपल्या प्रत्येक ट्विटला ‘बिग बी’ देतात नंबर 

मुंबई : वृत्तसंस्था – अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. समाजात घडणाऱ्या घटनांविषयी ते आपले मत ट्विटरच्या माध्यमातून मांडत असतात . त्यांच्या या सक्रियतेमुळे ट्विटरवर त्यांना अनेक फॉलोअर्स आहेत . आजपर्यंत त्यांनी केलेल्या प्रत्येक ट्विटला ते क्रमांक देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं . ते अशाप्रकारे ट्विटला क्रमांक का देतात ? याच उत्तर त्यांनी नुकतेच शाहरुख खानला दिल्याचं पाहायला मिळालं आहे.

शाहरुख आणि अमिताभ यांनी एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी शाहरुखने अमिताभ यांना प्रत्येक ट्विटला नंबर का देता ? असा प्रश्न विचारला. त्यावर आतापर्यंत केलेल्या ट्विटपैकी हे कितव्या क्रमांकाच ट्विट आहे हे लक्षात येण्यासाठी नंबर देत असल्याचं बिग बी यांनी सांगितलं.

“मी आतापर्यंतअनेक ट्विट केले आहेत. कधी कधी मी एकाच दिवशी २-३ ट्विटदेखील करत असतो . त्यामुळे आतापर्यंत केलेल्या ट्विटपैकी हे कितवं ट्विट आहे हे लक्षात येण्यासाठी आणि कोणत्या दिवशी कोणत्याविषयावर ट्विट केलं हे लक्षात राहण्यासाठी मी माझ्या प्रत्येक ट्विटला क्रमांक देतो”, असं अमिताभ यांनी यावेळी सांगितलं.

अमिताभ बच्चन यांनी मे २०१० मध्ये ट्विटर अकाऊंट सुरु केलं होत. त्यांनी पहिलं ट्विट १६ मे २०१० रोजी केलं होतं. या ट्विटनंतर आजपर्यंत ते रोज एक ट्विट करत असतात.  त्यामुळेच ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांच्या यादीत अमिताभ यांचं नाव आघाडीवर असतं.