कोजागिरी पौर्णिमा कधी ? काय आहे व्रत आणि महत्व, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : शीतलता आणि सुंदरता यांचा एक आल्हाददायी सुंदर समन्वय म्हणजे पौर्णिमा. यंदा कोजागरी पौर्णिमा ही शुक्रवारी ३० ऑक्टोबर रोजी आली आहे. कोजागरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा, रास पौर्णिमा, कौमुदी व्रत अश्या विविध नावाने ओळखले जातात. हा सण अश्विन पौर्णिमेला साजरा केला जातो. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो त्यामुळे चंद्र आपल्याला मोठा दिसतो.

असं म्हणलं जात कि चंद्राच्या प्रकाशात एक प्रकारची शक्ती असते जी आरोग्यदायी असते. चंद्राच्या किरणांमध्ये अमृत असतं अशा कोजागरी पौर्णिमेशी संबंधित अनेक गोष्टी विचलित आहेत. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राची किरणं ही विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करुन करमणुकीसाठी निरनिराळे बैठे खेळ, कार्यक्रम हे आवर्जून आयोजित करण्यात येतात.

कोजागरी पौर्णिमेची वेळ आणि शुभ वेळ
कोजागिरी पौर्णिमा प्रारंभ : ३० ऑक्टोबर २०२० रोजी ७ वाजून ४५ मिनिटे
कोजागिरी पौर्णिमा समाप्ती : ३१ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ८ वाजून १८ मिनिटे
कोजागिरी पौर्णिमाच्या दिवशी चंद्रोदय : ३० ऑक्टोबर २०२० ७ वाजून १२ मिनिटे

कोजागरी पौर्णिमेचं व्रत हे विशेष मानलं जातं. हे व्रत पाळल्यास विविध रोगांपासून मुक्तता मिळते. कोजागरी पौर्णिमेचा उपवास हा गंभीर आजारांनी पीडित असलेल्या व्यक्तींसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. विशेष म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री खीर बनवली जाते आणि ही खीर रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवण्यात येते. दुसऱ्या दिवशी हीच खीर प्रसाद म्हणून खाल्ली जाते.

मुलांच्या दीर्घायुष्यासाठी देखील हे व्रत करण्यात येते. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी तांबे किंवा मातीच्या कलशावर कपड्यांनी झाकलेली लक्ष्मीची मूर्ती स्थापित करुन तिची पूजा केली जाते. कोजागिरी पौर्णिमेला तुपाचे १०० दिवे लावले जातात. असे केल्याने लक्ष्मीची आपल्या घरावर कृपा होते आणि आपल्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते असे बोलले जाते.