दिलासादायक ! ‘या’ जिल्ह्यातील 12 Covid-19 Centres रिकामी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – महिन्यापूर्वीच सांगली (Sangali) जिल्ह्यात अशी अवस्था होती की, कोरोना (Coronavirus) रुग्णांच्या उपचारासाठी खाटा उपलब्ध नव्हत्या. आता सांगली जिल्ह्यात झपाट्यानं रुग्णसंख्या कमी होत आहे. अनेक कोविड सेंटर (Covid Centres) आणि खासगी रुग्णालयेदेखील रिकामे पडत आहेत. जिल्ह्यात 12 कोविड सेंटरमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही. तर 29 रुग्णालयांमध्ये 10 पेक्षा कमी रुग्ण आहेत. रुग्णांची संख्या कमी होत असल्यानं 5 कोविड रुग्णालयांनी उपचारातून मुक्त होण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे अर्ज केले आहेत.

कोरोना संसर्गामुळं सांगली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांवर (Health Systems)
कमालीचा ताण आला होता. ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर अभावी रुग्ण दगावण्याचा टक्का इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सांगलीत खूपच वाढला होता. गंभीर रुग्णांनाही रुग्णालयात बेड मिळाले नाहीत. काही रुग्णांना तर दिवसभर रुग्णालयापर्यंत हेलपाटे मारून उपचाराविना प्राण सोडावे लागले. बेड उपलब्ध नसल्यानं 7 हजारांहून अधिक रुग्णांना घरातच उपचार घ्यावे लागले. जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यात सांगलीतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचं खुद्द पालकमंत्र्यांनीच कबुल केलं होतं. यांतर सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली. गेल्या 4 दिवसांपासून रुग्णवाढीचा दर 15 ते 20 टक्क्यांपर्यंत खाली आल्यानं आरोग्य यंत्रणांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात सरकारी आणि खासगी अशा एकूण 62 रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांवर उपचाराची सोय केली आहे. यापैकी 12 रुग्णालयांमध्ये सध्या एकही रुग्ण नाही. 29 रुग्णालयांमध्ये 10 पेक्षा कमी रुग्ण आहेत. 19 रुग्णालयात 50 पेक्षा कमी रुग्ण आहेत. तर केवळ 3 रुग्णालयात 50 पेक्षा जास्त रुग्ण आहेत. मिरजेच्या शासकीय मेडिकल कॉलेज कोविड सेंटरमध्ये 182, सांगलीतील कोविड केअर सेंटरमध्ये 73, तर वॉनलेस हॉस्पिटलमध्ये 51 रुग्ण दाखल आहेत. उर्वरीत कोविड सेंटर आणि अधिगृहित केलेल्या खासगी रुग्णालयांमधील बेड रिकामे आहेत. एकही रुग्ण नसलेल्या 12 रुग्णालयांपैकी 5 रुग्णालयांनी उपचार सेंटर बंद करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे अर्ज पाठवले आहेत. मात्र दिवाळीनंतर पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यानं सध्याची सर्व कोरोना रुग्णालये सुरूच ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.