खवय्यांसाठी खुशखबर ! कोल्हापूरातील मटण विक्री बंद आंदोलन मागे, झाला दर निश्चित

कोल्हापूर : पोलिसनामा ऑनलाइन  – कोल्हापूरात गेले १० दिवस सुरु असलेले मटण विक्री बंद आंदोलन आता मागे घेण्यात आले असून ५२० रुपये किलो या दराने मटण विक्री करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. बोकड, बकऱ्यांचा तुटवडा असल्याने गेल्या दीड महिन्यांपासून कोल्हापूरातील मटणाचे दर वाढत होते. हा दर ६०० रुपये किलोवर गेल्याने लोकांमध्ये नाराजी वाढली. त्यावर आंदोलन सुरु झाले. त्यानंतर कृती समितीची स्थापना करण्यात आली.

कृती समितीने ४५० रुपये किलो हा दर निश्चित केला होता. मात्र, मटण विक्रेत्यांना हा दर मान्य नसल्याने गेल्या १० दिवसांपासून मटण विक्री बंद आंदोलन सुरु होते. त्यामुळे खवय्यांमध्ये मोठी निराशा होती. तसेच हॉटेलचालकांनाही या आंदोलनाचा त्रास सहन करावा लागत होता. मटण विक्रेत्यांनी बकऱ्यांची पैदास कमी झाल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बकरी महाग झाल्याने मटण जादा दराने विकणे भाग असल्याचे सांगत असत.

त्यांनी ५६० रुपये किलो दराने विक्री करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, त्याला कृती समितीचा विरोध होता. शेवटी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मध्यस्थीने मटण विक्रेते आणि कृती समिती यांच्या समेट झाला असून त्यात ५२० रुपये किलो या दराने मटण विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मटण विक्रेत्यांनी आंदोलन मागे घेतले असून आजपासून पुन्हा मटण विक्री सुरु होणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा –