कोल्हापूर: Kolhapur Crime News | मुलगाच हवा, यासाठी होणाऱ्या सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. स्वाती अमोल ऐवळे (वय-२३, रा. कोरोची) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अमोल ऐवळे, सासरे हणमंत ऐवळे, सासू सुरेखा ऐवळे आणि दीर राजू ऐवळे (सर्व रा. कोरोची) या चौघांवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फिर्याद सुरेश महादेव बिरलिंगे (वय ४३, रा. मेडद , ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी दिली आहे. (Married Woman Suicide Case)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती हिच्या सासरच्या मंडळींना मुलगाच हवा होता. मात्र दोन वर्षांपूर्वी तिला पुन्हा मुलगी झाली. त्यामुळे पती, सासरा, सासू यांच्याकडून तिचा छळ सुरु झाला. घरातील सर्व कामे करण्यास सांगून शिवीगाळ केली जात होती. तसेच माहेरच्या लोकांशी बोलू न देता माहेरीही पाठवले जात नव्हते. चारित्र्याच्या संशयावरून सतत मारहाण केली जात होती. या सर्व छळाला कंटाळून स्वाती हिने शक्रवारी दुपारी राहत्या घरी लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.