कोल्हापूर : पोटच्या मुलासह नदीत उडी टाकून आई-वडिलांची आत्महत्या, प्रचंड खळबळ

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पती, पत्नीने पोटच्या 14 वर्षाच्या मुलाला एकत्र दोरीने बांधून कुंभी नदीपात्रात उडी टाकून सामुहिक आत्महत्या केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शुक्रवारी (दि. 16) सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. दरम्यान आत्महत्येपूर्वी घरात लिहून ठेवलेली एक सुसाईड नोट मिळाली आहे. त्यात जीवनात अयशस्वी झालो आहे. आत्महत्यास कोणालाही जबाबदार धरु नये. वडिलांना आणि मुलीला सांभाळा असा मजकूर लिहिला आहे. मात्र नेमके आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेबद्दल पन्हाळा तालुक्‍यात हळहळ होत आहे.

दीपक शंकर पाटील (वय 40), वैशाली दीपक पाटील (वय 35 ), विघ्नेश पाटील (वय 14 तिघेही रा. गोठेगाव ता. पन्हाळा) असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पाटील दाम्पत्याने आपल्या 14 वर्षीय मुलगा विघ्नेश याला आपल्याबरोबरच एकत्र दोरीने बांधून घेऊन कुंभी नदीच्या पात्रात उडी टाकून आत्महत्या केली. पाटील हे गोठे गावात आपले वडील, पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. ते शेती व्यवसाय करत होते. गुरुवारी रात्री घरातून अकरा वाजता बाहेर पडल्यानंतर या तिघांचा मध्यरात्रीपर्यंत शोध घेण्यात आला. पण बाहेर कुठेतरी गेले असतील असे समजून नातेवाईक झोपी गेले. मात्र आज सकाळी थेट कुंभी नदीच्या पात्रात या तिघांचा मृतदेह एकाच ठिकाणी आढळला, हे मृतदेह बाहेर काढतानाही पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. कारण तिन्ही मृतदेह एकमेकांना बांधलेले होते. खाऊन पिऊन सुखी असलेल्या या कुटुंबाच्या आत्महत्येने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांची 16 वर्षाची मुलगी मामाच्या गावी गेल्यामुळे या घटनेतून बचावली आहे.