भयंकर ! दारुड्या बापानंच आपल्या मुलाला 5 लाखात तृतीयपंथीयाला विकलं

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले. त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच एका बापाने आपल्या मुलाला दत्तक दिल्याचे सांगत चक्क 5 लाख रुपयांना विकल्याचा खळबळजनक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे. कोरोना व्हायरसमुळे माणुसकी, नातीगोती यांचा अंतच झाल्याचे या घटनेमुळे पुढे आले आहे. मुलाच्या आजीने जावयाचे हे बिंग फोडल्यानंतर सध्या मुलाचा ताबा द्यायचा कोणाला यावरुन वाद सुरु झाला आहे. यासंदर्भात बाल कल्याण समिती सोमवारी निर्णय घेणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पन्हाळा तालुक्यातील काटेभोगाव येथील दिगंबर उर्फ उत्तम ज्योतिराम पाटील हा गेले दोन-तीन वर्षे कोल्हापुरमध्ये वास्तव्यास आहे. तो चांदी कारागीर आहे. लॉकडाऊनच्या काळात त्याचे काम गेले त्यातच मागील तीन वर्षापासून त्याची पत्नी आजारी आहे. त्याला दोन मुले आहेत. आजारी पत्नीच्या उपचाराचा खर्च आणि मुलांना सांभाळणे अवघड होऊ लागल्याने त्याने पत्नी आणि एका मुलाला माहेरी पाठवले. त्यांनंतर तो आणि दहा वर्षाचा मुलगा गंगवेश येथे राहू लागले. या काळात त्याला दारुचे व्यसन लागले. तो कर्जबाजारीही जाला. एका मुलालाही सांभाळणे अशक्य झाल्याने अखेर त्याने मुलाला दत्तक देण्याचा निर्णय घेतला.

दिगंबर याने साळोखेनगर येथील गजेंद्र गुंजाळ या तृतीयपंथीयाशी संपर्क साधला. आपल्या मुलाला त्याने तृतीयपंथीयास नोटरीद्वारे दत्तक दिले. हा प्रकार मे महिन्यात झाला. जावयाजवळ नातू नसल्याचे लक्षात आल्यानंतर आजीने त्याच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. पण तो उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळत होता. शेवटी आजीने कोल्हापुरातील एका सामजिक संस्थेच्या मदतीने या मुलाला शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हा मुलगा एका तृतीयपंथीयाकडे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ती पोलिसांच्या मदतीने त्या तृतीयपंथीयापर्यंत पोहोचली. माझ्या नातवाला परत द्या अशी मागणी केली, तेव्हा यासाठी मी पाच लाख रुपये मोजले आहेत, ती रक्कम परत द्या आणि नातू घेऊन जा असे त्या तृतीयपंथीयाने सांगितले.

आपल्या जावयाने नातवाला पाच लाख रुपयाला विकल्याचा आरोप आजीने पोलिसांकडे की. त्यानुसार पोलिसांनी उत्तम आणि गुंजाळ याला मुलासह बोलावून घेतले. यावेळी मुलाने मात्र मी वडिलांकडे राहणार नाही, मी गुंजाळ यांच्याकडे राहणार असे सांगत आजीकडे जाण्यास नकार दिला. त्यामुळे या मुलाचा ताबा कोणाकडे देयचा असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. अखेर या मुलास येथील बाल कल्याण संकुलात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी (दि.21) याबाबत सर्वांशी चर्चा करुन बाल कल्याण समिती आपला निर्णय देणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like