कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन
लघुशंकेसाठी उभा राहिल्याच्या कारणावरून कोल्हापूरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील पादचारी उड्डाण पुलाशेजारी असलेल्या पेट्रोल पंपावर हवेत गोळीबार करण्यात आला. ही घटना गुरुवारी (दि.७) रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून या प्रकारामुळे नागरिकांची पळापळ होऊन गोंधळ उडाला.
मुकुंद रामचंद्र यादव (वय 47, रा. जासूद गल्ली, मंगळवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री पेट्रोल पंपाजवळ एक प्रवासी लघुशंकेसाठी उभा राहिला होता. यावेळी त्याला सुनील नलवडे याने हटविण्याचा प्रयत्न केला. यातून दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. वाद वाढत गेल्याने लोकांची गर्दी जमली. गर्दी पाहून पेट्रोल पंपावर असणारा मुकुंद रामचंद्र यादव तेथे आला. त्यामुळे वाद अधिकच वाढत गेला. मुकुंदने पेट्रोल पंपाच्या दिशेने गेला आणि पिस्तुल घेऊन आला. यावेळी त्याने हवेत गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने एकच पळापळ होऊन गोंधळ उडाला. या पळापळीत काहीजण पडल्याने किरकोळ जखमी झाले.
घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, पोलिस उपनिरीक्षक रणजीत पाटील घटनास्थळी फौजफाट्यासह आले. गोळीबार करणारा मुकुंद हातात पिस्तुल घेऊन तसाच उभा होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे हस्तगत केली. शाहूवाडीचे पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.