कोल्हापूरात महापूराने ‘हाहाकार’ ! पंचगंगा, वारणा, कोयनेचा ‘प्रलय’, जीवनावश्यक वस्तूंचा ‘तुटवडा’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे राधानगरी धरणातून १८ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर वारणा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असल्याने कोल्हापूरसह सांगली, कराडमध्ये महापूराने हाहाकार उडाला आहे. आतापर्यंत १ लाख ३५ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. गुुरुवारीही कोल्हापूर, सातारा व पुण्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने ही पूर परिस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे.

पुराबरोबरच आता जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोल्हापूर शहराला पाण्याचा संपूर्ण वेढा पडला असून गेल्या तीन दिवसांपासून शहरात प्रवेश करणे अशक्य झाले आहे. नौदल, एनडीआरएफ, पोलीस, अग्निशामक दलाकडून लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. अजूनही हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. आता पुरातून बाहेर काढलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी कोठे ठेवायचे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दुध, पाणी, पेट्रोलची टंचाई

कोल्हापूर शहर निम्म्याहून अधिक पाण्यात गेल्याने दुधाचे संकलन पूर्णपणे बंद पडले आहे. सुरक्षितस्थळी आणलेल्या लोकांपर्यंतही दुध पोहचविणे शक्य होत नाही. शहरात पाण्यात अडकलेल्या लोकांना शुद्ध पाणी आणि दुध मिळणेही अशक्य झाले आहे. शहरातील सर्व पेट्रोल पंप पाण्याखाली गेल्याने पेट्रोल मिळणे अवघड झाले आहे.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील २०४ गावांना या महापुराचा फटका बसला आहे. या गावांमधून ५१ हजार जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू विशेषत: अन्नाची पाकिटे देण्यात येत आहे. या महापूरामुळे पंचगगेंसह अनेक नद्यांच्या काठी असलेल्या पाणी पुरवठा केंद्रात पाणी शिरले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३९० गावांचा पाणीपुरवठा बंद करावा लागला आहे.

साडे पाच हजार गाड्या अडकल्या

पुणे बंगलोर महामार्ग गेल्या ३ दिवसांपासून बंद पडला असल्याने या महामार्गावर सुमारे साडेपाच हजार गाड्या अडकून पडल्या आहेत. वाटेत ठिकठिकाणी अडकलेल्या या गाड्यांमधील लोकांचे हाल होत आहे. कराड ते कोल्हापूर दरम्यान अडकलेल्या या गाड्यांना कराड येथेही महामार्गावर पाणी आले असल्याने मागेही येता येत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूने त्या पाण्यामध्ये अडकल्या आहेत. अनेक मोटारीतील लोकांनी बाजूच्या हॉटेलमध्ये आसरा घेतला असला तरी तेथील जीवनावश्यक वस्तंचा तुटवडा जाणवू लागला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like