माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या चालकाला भर चौकात भोसकण्याचा प्रयत्न, प्रचंड खळबळ

इस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाइन – माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कारवरील चालकावर चाकूने खुनी हल्ला केल्याचा प्रकार शनिवारी दुपारी घडला. खुनी हल्ल्याप्रकरणी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार शकील हारुण गोलंदाज (वय-34 रा. इस्लामपूर) याला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा साथीदार सुहेल मुल्ला हा फरार आहे. गोलंदाज याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणी कारचालक अनिल अशोक पवार (वय-26 रा. कुरपळ, ता. वाळवा) यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिल पवार हे सदाभाऊ खोत यांच्या कारवती चलक म्हणून कामाला आहे. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास अनिल व स्वप्नील सूर्यंवशी हे दोघेजण कार घेऊन येथील एका पंपावर तेल टाकण्यासाठी गेले होते. त्यावेळी शकील गोलंदाज याने कार आडवी मारुन अनिल यांची कार थांबवली.

त्यावेळी गाडीत गुंड शकील गोलंदाज याच्यासोबत त्याचा साथीदार सुहेल मुल्ला हे होते. तू माझ्या गाडीला आडवी गाडी मारतोस काय रे, असे म्हणत त्याने शिवीगाळ केली. त्यावेळी मी गाडीतून खाली आलो असता त्याने चाकू काढून माझ्या पोटात भोसकण्याचा प्रयत्न केला. चाकूचा वार चुकवत मी गाडीत बसलो. आरडाओरडा झाल्याने लोक जमा झाले. लोकांकडे चाकू दाखवून कोणी पुढे आले तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत. त्याने मला जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार अनिल यांनी दिली आहे.