धनगर आरक्षण : गोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत ! धनगर आरक्षणासाठी ढोल घुमणार

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या राज्यभर मराठा आरक्षणाचा प्रश्न गाजत आहे अशताच आता धनगर समाजानंही आरक्षणासाठी नव्यानं हाक दिली आहे. आदिवासींना दिले जाणारे आरक्षणाचे सर्व लाभ हे धनगरांनाही मिळावेत या मागणीसाठी शुक्रवारी ( दि 25 सप्टेंबर) रोजी राज्यभर ढोल बजाओ आंदोलन केलं जाणार आहे अशी माहिती धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. सांगलीत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सरकारनं धनगर आरक्षणाकडे दुर्लक्ष करून धनगर समाजावर अन्याय केल्याचा आरोपही पडळकर यांनी यावेळी केला.

गोपीचंद पडळकर म्हणाले, ” आदिवासींप्रमाणे आरक्षणाचा लाभ मिळणं हा धनगरांचा अधिकार आहे. राज्य सरकारनं गेल्या 10 महिन्यांपासून या मागणीकडं दुर्लक्ष केलं. आरक्षणाच्या मागणीसाठी 25 सप्टेंबर रोजी राज्यात सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालये, पंचायत समिती, तहसिल कार्यालये आणि मंदिरासमोर ढोल बजाओ, सरकार जगाओ हे आंदोलन करण्यात येणार आहे.”

पुढे बोलताना पडळकर म्हणाले, “धनगर समाज आरक्षणावरून आक्रमक झाला असताना समाजातील कोणत्याही नेत्यांशी बोलायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. धनगर समाजाला सरकारकडून दुजाभावाची वागणूक मिळत आहे. सरकारमधील काही नेते जेव्हा विरोधात होते तेव्हा धनगर समाजाचा पुळका घेऊन त्यांनी विधानसभेत धनगरी वेशभूषेत आरक्षणाची मागणी केली होती. आता सत्तेत आल्यानंतर त्यांना धनगर आरक्षणाचा विसर पडल्याचं दिसत आहे.”

धनगर समाज हा भटका असल्यानं आदिवासींना दिले जाणार आरक्षणाचे सर्व लाभ राज्यातील धनगरांनाही मिळावेत. राज्यात आण केंद्रात एकाच प्रवर्गात धनगरांचा समावेश व्हावा अशी धनगर समाजाची मागणी आहे.