कोल्हापूरला ३० वर्षानंतरचा सर्वात मोठा ‘महापूर’, पुणे-बंगलुरु महामार्ग ‘बंद’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-बंगलुरु महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी आल्याने हा महामार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे जागोजागी मोठ्या प्रमाणावर वाहने अडकून पडली आहे. कोल्हापूरात ३० वर्षानंतरचा सर्वात मोठा पूर आला आहे.

पंचगंगा नदीला महापूर आला असून पुराचे पाणी कोल्हापूर शहरातील मध्य वस्तीतील दसरा चौकात आले आहे. दसरा चौक चारही बाजूने पाण्याने वेढला गेला आहे. पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत असलेल्या १०७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ५० फुट ९ इंच इतकी झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील अनेक भाग पाण्यामध्ये बुडाले आहेत. जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

पंचगंगा नदीचे पाणी मध्यरात्री पंचगंगा रुग्णालयाच्या मारुती मंदिराजवळ आले. १९८९ मध्ये मोठ्या प्रमाणावर पंचगंगा नदीला महापूर आला होता. त्यावेळी या ठिकाणी पुराचे पाणी पसरले होते. त्याची खुण म्हणून महापालिकेने तेथे एक फलक लावला आहे. मध्यरात्री महापुराचे पाणी या फलकाजवळ पोहचले.
पुणे बंगलुरु महामार्गावर पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी आल्यामुळे शिरोली पोलिसांनी हा राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद केली आहे.

कोल्हापूर शहराला पाण्याचा वेढा पडला असून शहरात कोणत्याही भागातून शहरात प्रवेश करण्याचे सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरले असून सर्वत्र पाणी असताना आता कोल्हापूरकराला पुढील दोन दिवस पाणी मिळण्याची शक्यता नाही.
७ व ८ ऑगस्टला कोल्हापूरला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूरमधील पूर परिस्थिती आणखी गंभीर बनण्याची शक्यता आहे. अनेक सोसायट्यांमधील पहिले मजले पाण्याखाली बुडाले असून एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे.

माळशेज घाटात सोमवारी दुपारी दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर दरड दूर करण्यात येऊन एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली होती मात्र, त्यानंतर पुन्हा एका ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. राज्यात विशेषत: कोकण व पश्चिम महाराष्ट्रात जागोजागी पावसामुळे रस्ते बंद झाले असल्याने प्रवासाला बाहेर पडताना अगोदर माहिती घेऊनच लोकांनी बाहेर पडावे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like