कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे आणि त्या सर्कसमध्ये सर्व प्राणी आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मान्य केलं ते बरं झालं, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (दि.10) लगावला.
भाजपनं आयोजित केलेल्या व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. राज्यात सरकारच्या नावाखाली सकर्स सुरु असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली होती. राजनाथ सिंह यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी खोचक टीका केली. रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारमधील मंत्री लोकशाही मार्गानं निवडून आलेल्या सरकारला सर्कस म्हणतात, अशी खोचक टीका त्यांनी केली होती.
कोकणात निसर्ग चक्रिवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी शरद पवार यांना राजनाथ सिंह यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता, आमच्या सर्कशीत प्राणी आहेत, पण विदुषकाची कमी आहे, अशी कोपरखळी हाणली होती. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार याना आज टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस होता. विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घतला.