Kolhapur News : सूतगिरणीच्या 70 वर्षाच्या चेअरमनकडे 45 लाखाच्या लाचेची मागणी, 20 लाखाची लाच घेताना बडा अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे विभागातील कोल्हापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोल्हापूरमध्ये मोठी कारवाई केली आहे. तब्बल 45 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केल्यानंतर 20 लाख रूपयांची लाच घेणार्‍या बड्या अधिकार्‍याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकानं रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाली आहे. या कारवाईमुळं संपुर्ण कोल्हापूर शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सहाय्यक नगररचना अधिकारी गणेश हणमंत माने (वर्ग-2, सहाय्यक नगर रचनाकार, सह जिल्हा निबंधक वर्ग-1, कोल्हापूर, रा. हरिओम नगर 15 वी गल्ली कोल्हापूर) असे लाच घेणार्‍या बहाद्दराचे नाव आहे. याप्रकरणी 70 वर्षीय तक्रारदाराने तक्रार दिली आहे. तक्रारदार हे जंगमवाडी (ता. हातकणंगले) येथे सूतगिरणीचे चेअरमन असून ती संस्था अवसायनात निघाली आहे. त्या संस्थेच्या जमिनीचे शासकीय मूल्यांकन करून देण्यासाठी गणेश माने यांनी 45 लाख रूपयांच्या मागणी केली होती. त्यापैकी 20 लाख रूपयाची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने गणेश मानेला रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळं संपुर्ण कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलिस निरीक्षक युवराज सरनोबत, सहाय्यक फौजदार बबंरगेकर, पोलिस हवालदार पोरे, पोलिस नाईक कदम, घोसाळकर, चालक हवालदार अपराध यांच्या पथकाने केली आहे.