Kolhapur : सुट्टीवर आलेल्या जवानाची आत्महत्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  पाच दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेल्या जवानाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.2) पन्हाळा तालुक्यातील कुशिरे माळावर घडली. बजरंग बळवंत चौगले (वय-32 रा. आवळी बुद्रुक ता. राधानगरी) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे.

बजरंग चौगले हे 11 वर्षापूर्वी सैन्यदलात भरती झाले होते. त्यांनी बेळगाव, आसाम आणि कोल्हापूरमध्ये काही काळ सेवा बजावली होती. सध्या ते आसाममध्ये 109 बटालियनमध्ये कार्यरत होते. पाच दिवसांपूर्वी ते सुट्टीवर आले होते. मंगळवारी सकाळी कुशिरे गावच्या हद्दीत म्हसोबा मंदिराजवळ विषारी द्रव्य प्राशन केले. यानंतर गावातील मित्राला त्यांनी व्हिडीओ कॉल करुन माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. बजरंग यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली. बजरंग यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. बजरंग यांच्या पश्चात आई-वडील, एक विवाहित बहिण असा परिवार आहे.