कोल्हापूरमध्ये महिलांच्या ‘आंदर-बाहर’ जुगार आड्ड्यावर पोलिसांचा छापा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिसांकडून पुरुषांच्या जुगार आड्ड्यावर छापा टाकल्याचे ऐकले असेल. पण महिलांचाही जुगार अड्डा असतो असे आपण विचारही करणार नाही. मात्र, कोल्हापूरमध्ये पोलिसांनी महिलांच्या जुगार आड्ड्यावर छापा टाकून महिलांच्या जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे. शहरात पहिल्यांदाच महिलांच्या जुगार अड्डा उघडकीस आल्याने शहरात चर्चेचा विषय बनला आहे.

कोल्हापूर पोलिसांनी आज (सोमवार) टेंबलाई नाका परिसरातील झोपडपट्टीत महिलांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच महिलांसह अड्डा मालक महिला व दोन युवक अशा आठ जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात आणि शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत सहा हजार रुपयांसह दोन मोबाइल, जुगाराचे साहित्य असा एकूण चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी अड्डा मालक शोभा संजय हेगडे (रा. झेंडा चौक, कागल), निलम विजय कांबळे ( रा. मणेर मळा, उचगांव), वर्षा इकबाल लोंढे (वय-30), दीपाली आकाश लोंढे (वय-20 दोघी रा. टाकाळा झोपडपट्टी), भिंगरी अविनाश सकट (वय-40 रा. राजेंद्र नगर झोपडपट्टी), सुरेखा राजू नरंदेकर (वय-30 रा टेंबलाई नाका), सुनिल संभाजी घोडके (वय-38 रा. घोडके चाळ, टेंबलाई नाका), करीम मोहिद्दीन खान (वय-38 रा. ओमसाई पार्क, उचगांव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

टेंबलाई नाका परिसरामध्ये असलेल्या झोपडपट्टीमध्ये महिलांचा आंदर-बाहर जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे राजरामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवनाथ घुगरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने या आड्ड्यावर छापा टाकला. यापूर्वी महिलांना दारू अड्डा, मटका अड्डा चालवणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. परंतु महिलांच्या जुगार अड्ड्यावर करण्यात आलेली ही कारवाई जिल्ह्यातील पहिलीच कारवाई आहे.