कोल्हापूर पोलिसांची शहिदांना मानवंदना ! शहिदांच्या कुटुंबीयांना देणार ३० लाख

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांना जागेवरच वीरमरण आले. यामध्ये महाराष्ट्रातील बुलढाण्यातील दोन शहीद जवानांचा समावेश आहे. शहीद जवान संजय रजपूत, नितीन राठोड यांच्या कुटुंबीयांसाठी कोल्हापूर पोलिस दलामार्फत शनिवारी एक दिवसाचा पगार जाहीर करण्यात आला.

दोनही शहिदांच्या कुटुंबीयांना ३० लाख रुपयांचे सहाय्य लवकरच सुपुर्द करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. यासंदर्भात सकाळी पोलिस मुख्यालयात झालेल्या बैठकीला अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाटगे, पोलिस उपअधीक्षक (गृह) सतीश माने, किशोर काळे, डॉ. प्रशांत अमृतकर, सूरज गुरव, गणेश बिरादार, अनिल कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी अनेक मंडळी पुढे येत आहे. केद्रिय गृह मंत्रालयाने नुकत्याच लागू केलेल्या निर्देशानुसार अधिकारी, कर्मचार्‍यांचा एक दिवसाचा पगार शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सुपुर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अवघ्या काही तासांत पोलिस दलांतर्गत घटकातून निधी संकलनाची प्रक्रियाही सुरू झाली.

अधिकारी, कर्मचार्‍यांनी प्रत्येकी एक हजार रुपये यानुसार निधी संकलित करून बुलढाण्यातील शहीद जवान संजय रजपूत, नितीन राठोड यांच्या कुटुंबीयांकडे लवकरच सुपुर्द करण्यात येणार आहे. असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले. दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले महाराष्ट्रातील जवान संजय राजपूत हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर इथले आहेत. तर शहीद नितीन राठोड हे बुलढाण्यातीलच लोणार तालुक्यातील आहेत.